पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना मारहाण करणे, पर्यटकांच्या खोलीत रात्री डुप्लिकेट चावीच्या सहाय्याने घुसणे अशा दोन घटना रविवारी व सोमवारी गोव्यात घडल्या. या प्रकारांमुळे गोव्याची बदनामी होत आहे; पण त्याचा पर्यटन उद्योगावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
मांद्रे मतदार संघातील मोरजी समुद्र किनाऱ्यावर सावंतवाडीहून आलेल्या पर्यटक कुटुंबाला मारहाण झाली. कुणीतरी मद्य पिऊन या कुटुंबातील महिला व मुलांना मारहाण केली आणि त्याचे पडसाद लगेच उमटले. सांवतवाडी ते पत्रादेवी मार्ग सोमवारी अडवण्यात आला.
गोव्याची वाहने महाराष्ट्रात आणू नका, असे म्हणत युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी महत्त्वाचा असा हा महामार्ग अडवल्याने हजारो लोक तास दोन तास अडकून पडले. मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी मध्यस्थी करून मारहाण करणाऱ्यांना बोलावून, ज्यांना मारहाण झाली होती त्या कुटुंबाची माफी मागायला लावली.
दुसऱ्या घटनेत कोलवा येथील हॉटेलचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फिरत असून त्यात मराठी बोलणाऱ्या महिलेचा दावा आहे की रात्रीच्या ११ वा. डुप्लिकेट चावी वापरून हॉटेलचा कर्मचारी खोलीत घुसला, त्यांना जाग आली नसती तर नको ते घडले असते.
महत्त्वाचे म्हणजे या व्हिडीओत सदर कर्मचारी व त्या हॉटेलचा व्यवस्थापक दिसत आहेत. या दोन घटना दोन दिवसांत घडल्या. सध्याचा सोशल मीडियाचा जमाना असल्याने व्हिडीओच्या माध्यमातून अशा घटना लगेच जगभर पसरतात. मोरजी येथील घटनेत आमदारांनी हस्तक्षेप करून ती मिटवली तरी गोव्यात पर्यटकांना मारहाण होत असल्याचा संदेश जगभर गेला.