पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोवा सरकारच्या पर्यटन खात्याने राबवलेल्या विविध उपक्रमांमुळे अंतर्गत पर्यटन, स्टे होम, आध्यात्मिक पर्यटन आदी आयामांमुळे गोव्यात या वर्षी १ कोटीपेक्षा जास्त देशी व विदेशी पर्यटकांनी गोव्याला भेट दिली. महत्त्वाचे म्हणजे हडफडे येथील नाईट क्लबमध्ये घडलेल्या जळीतकांडामुळे पर्यटक कमी होण्याची भीती व्यक्त होत असताना, राज्याला विक्रमी पर्यटकांनी भेट दिली.
निसर्गसौंदर्य आणि सुंदर अशा समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्याने पर्यटन क्षेत्रात एक नवा इतिहास रचला आहे. पर्यटन खात्याने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, २०२५ या वर्षात गोव्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची एकूण संख्या १ कोटी ८ लाखापेक्षा जास्त आहे.
२०२३ आणि २०२४ या वर्षांतील सर्व जुने विक्रम मोडीत काढत यंदा पर्यटकांनी गोव्याला भेट दिली. कोविड-१९ महामारीनंतर पर्यटन क्षेत्राचे झालेले हे पुनरुज्जीवन राज्याच्च्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत आशादायक मानले जात आहे.
पर्यटन खात्याने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये १,०२,८४,६०८ देशांतर्गत (देशी) पर्यटकांनी गोव्याला पसंती दिली, तर ५,१७,८०२ विदेशी पर्यटकांनी गोव्याच्या संस्कृतीचा आनंद लुटला. २०१७ मध्ये ७७ लाखांच्या घरात पर्यटकांची असलेली ही संख्या आता १,०८,०२,४१० वर पोहोचली आहे.
कोविडच्या संकटानंतर २०२३ पासून पर्यटकांच्या संख्येत सातत्याने मोठी वाढ होत असून, २०२४ मध्ये १ कोटी ४ लाखांचा टप्पा गाठल्यानंतर २०२५ मध्ये यात आणखी मोठी भर पडली आहे. पर्यटन तज्ज्ञांच्या मते, देशी पर्यटकांच्या संख्येत झालेली ही अभूतपूर्व वाढ गोव्याला वर्षभर पर्यटन सुरू राहणारे राज्य म्हणून ओळख मिळवून देत आहे. आगामी काळात ही वाढ अधिक गतीने होईल, असा विश्वास पर्यटक व्यावसायिक व्यक्त करत आहेत.
सरकारच्या धोरणांचा विजय : मंत्री खंवटे
राज्यात दिवसेंदिवस पर्यटक वाढत आहेत. कारण गोवा आंतरराष्ट्रीय पर्यटनाचे केंद्र आहे. गेल्या वर्षभरात गोवा सरकारच्या पर्यटन खात्याने अनेक नवे उपक्रम सुरू केले आहेत. स्टे होम, ग्रामीण पर्यटन सुविधा, आध्यात्मिक पर्यटन उपक्रमांमुळे किनाऱ्यांवर फिरुन मन प्रसन्न झालेले पर्यटक या नव्या उपक्रमांचा लाभ घेत आहेत.
त्यामुळे पर्यटकांच्या संखेत वाढ होत आहे. गोव्यात येणाऱ्या पर्यटकासाठी हव्या त्या सुविधा पर्यटन खात्याने उपलब्ध केलेल्या आहेत. सुरक्षीत व दर्जेदार पर्यटन सेवा दिली जात आहे. विदेशी पर्यटक गोव्यात मोठ्या संख्येने यावेत यासाठी विदेशात जागृती व प्रसिध्दी उपक्रम राबवले जात आहेत. त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढली असून ही आपल्यासाठी प्रेरणादेणारी बाब आहे, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी म्हटले आहे.
अपप्रचारावर मात...
पर्यटन हंगाम ऐन बहरात असतानाच हडफडे येथील नाईट क्लबमध्ये जळून २५ व्यक्तींचा मृत्यू झाला. त्यामुळे गोव्याच्या पर्यटन खात्याची बदनामी करण्याचे आयते कोलीत काहींच्या हाती मिळाले होते.
मात्र, सदर जळीतकांड सरकारच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे व क्लबच्या बेकायदेशीरपणामुळे घडल्याचे समोर आले होते. त्यामुळे गोव्यात पर्यटकांची संख्या रोडावण्याची भीती व्यक्त करण्यात आली. मात्र, या दुर्घटनेनंतरही पर्यटकांनी मोठ्या संख्येने भेट दिली असल्याचे स्पष्ट झाले आहे.