मडगाव : रविना कुरतरकर
गोव्याच्या पर्यटनाचा सीजन यंदा पुन्हा बहरला असून राज्यात देशी पर्यटकांचा ओघ लक्षणीय वाढला आहे. विशेषतः शेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटकातून गोव्याला येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महाराष्ट्रातून यंदा तब्बल १५.९० लाख पर्यटकांनी गोव्याला भेट दिली असून गेल्या मोसमाच्या तुलनेत त्यात ४७ टक्क्यांची वाढ झाली आहे.
परदेशी पर्यटकांमध्ये मात्र ब्रिटिश पर्यटकांनी आघाडी कायम ठेवली असून रशियन आणि अमेरिकन पर्यटकांची संख्याही वाढली आहे. पर्यटन खात्याच्या माहितीनुसार, २०२४-२५ मध्ये महाराष्ट्रातून १०.८० लाख पर्यटक गोव्यात आले होते. यंदा हा आकडा १५.९० लाखांवर पोहोचला. कर्नाटकातूनही पर्यटकांची संख्या ६.५० लाखांवरून ८.६० लाखांपर्यंत वाढली.
दिल्लीमधून यंदा ४.४० लाख पर्यटक गोव्यात दाखल झाले असून मागील मोसमात ही संख्या ३.३० लाख होती. देशी पर्यटकांमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकनंतर दिल्ली, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, केरळ, हरियाणा आणि तमिळनाडू या राज्यांचा क्रमांक लागतो.
परदेशी पर्यटकांमध्ये यंदा ७०,३४९ ब्रिटिश पर्यटकांनी गोव्याला भेट दिली. मागील मोसमातील ४७,२१२ च्या तुलनेत ही वाढ ४९ टक्के आहे. रशियन पर्यटकांची संख्या ३०,१०३ वरून ४३,३९६, तर अमेरिकन पर्यटकांची संख्या १७,४२५ वरून २४,८७८ झाली. जर्मनीतून यंदा ११,९५८ पर्यटक आले.
गोव्यात देशी-विदेशी पर्यटकांचा ओघ वाढला आहे. विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटकातील पर्यटकांनी गोव्याला मोठी पसंती दिली. महाराष्ट्रातून यंदा तब्बल १५.९० लाख पर्यटक गोव्यात दाखल झाले असून गेल्या मोसमाच्या तुलनेत त्यात ४७ टक्क्यांची भर पडली. कर्नाटकातूनही ८.६० लाख पर्यटक आले. परदेशी पर्यटकांमध्ये ब्रिटिशांची संख्या सर्वाधिक असून रशियन आणि अमेरिकन पर्यटकांची संख्याही वाढली आहे.
पर्यटन संचालकांची प्रतिक्रिया "पर्यटकांची वाढती संख्या राज्यातील आदरातिथ्य क्षेत्रासाठी दिलासादायक आहे. आगामी मोसमात पर्यटकांची संख्या आणखी वाढण्याची अपेक्षा आहे."- केदार नाईक, पर्यटन संचालक