पणजी : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) अंतर्गत गोव्यात शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात टप्प्याटप्प्याने बदल करण्यात येत आहे. २०२६-२७ या शैक्षणिक मेघना शेटगावकर वर्षापासून इयत्ता पहिली, दुसरी, चौथी, पाचवी, सातवी आणि आठवीचा नवीन अभ्यासक्रम लागू केला जाणार असल्याची माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) च्या संचालिका मेघना शेटगावकर यांनी दिली.
गेल्या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी आणि सहावीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला होता. त्यानंतर आता पुढील टप्प्यात आणखी सहा वर्गामध्ये नवीन अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे. नवीन अभ्यासक्रमाची रचना मुख्यत्वे एनसीईआरटीच्या धर्तीवर करण्यात येणार आहे.
मात्र, कोकणी आणि मराठी विषयांचे पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम गोव्यातच तयार करण्यात येणार आहेत. गोव्याच्या विद्यार्थ्यांना स्थानिक इतिहासाची माहिती मिळावी, यासाठी इतिहास विषयातील काही गोवा-केंद्रित धडे एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येणार असल्याचे शेटगावकर यांनी स्पष्ट केले.
नवीन अभ्यासक्रम समजून घेण्यासाठी आणि कृतीआधारित शिक्षणपद्धतीशी विद्यार्थ्यांना जुळवून घेता यावे, यासाठी इयत्ता ५ वी ते ८ वी साठीचा ब्रिज कोर्स एप्रिल महिन्यात पूर्ण करण्यात आला आहे. इयत्ता १ ली ते ४ थीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा जूनमध्ये सुरू झाल्यानंतर तीन आठवड्यांचा ब्रिज कोर्स राबविण्यात येणार आहे.
इयत्ता १ लीच्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यमापनाची व्यवस्था नसल्यामुळे त्यांच्यासाठी 'विद्या प्रवेश' हा विशेष ब्रिज कोर्स तीन महिन्यांच्या कालावधीसाठी आयोजित करण्यात येणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय वातावरणाशी जुळवून घेण्यास मदत होणार आहे. दरम्यान, इयत्ता ९ वी आणि १० वीच्या अभ्यासक्रमात यंदाच्या शैक्षणिक वर्षात कोणताही बदल होणार नसल्याचे शेटगावकर यांनी स्पष्ट केले.
सध्या नवीन अभ्यासक्रमानुसार शिकत असलेले इयत्ता ८ वीचे विद्यार्थी पुढील वर्षी ९ वीमध्ये प्रवेश करतील, त्यावेळी माध्यमिक स्तरावरील नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुरू होईल, असे संचालिका मेघना शेटगावकर यांनी 'पुढारी'शी बोलताना सांगितले.
पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वितरण...
इयत्ता पाचवी ते आठवीच्या नवीन पुस्तकांचे वितरण विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे. जूनमध्ये शाळा सुरू झाल्यावर पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येईल. त्याबाबतची संपूर्ण प्रक्रिया सुरू आहे. विद्यार्थ्यांना नव्या शिक्षण पद्धतीची जळवून घेण्यासाठी संबंधित शिक्षकांनाही प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती शेटगावकर यांनी दिली.