Land Pudhari
गोवा

Goa TCP notification | पर्यावरणाच्या रक्षणासाठी गोवा सरकारचा मोठा निर्णय! 9.7 लाख चौ. मीटर क्षेत्र 'विकास निषिद्ध' घोषित.

Goa TCP notification | माजॉर्डा, कोन्सुवासह साओ जॉर्ज बेटावरील जमिनीचा समावेश

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
नगर नियोजन (टीसीपी) खात्याने प्रादेशिक आराखड्यात २०२१ मध्ये औपचारिक सुधारणा करून सासष्टीतील माजॉर्डा व कोन्सुवा तसेच बार्देशमधील म्हापसा जवळील साओ जॉर्ज बेट परिसरातील एकूण ९.७ लाख चौरस मीटर जमीन विकास निषिद्ध क्षेत्र (एनडीए) म्हणून घोषित केले आहे.

भातशेती, खाजन जमीन, जलाशय, वाळूचे ढिगारे आणि संरक्षित वनक्षेत्राचा मोठा भाग असलेल्या या तीन प्रस्तावांना अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, गोव्यातील मुंबई उच्च न्यायालयात अंतिम निकालासाठी प्रलंबित असलेल्या रिट याचिका क्रमांक ५३ आणि ५४/२०२४ मधील निकालाच्या अधीन ही मंजुरी राहणार आहे, अशी माहिती मुख्य नगर नियोजक वर्टीका डागुर यांनी दिली.
सरकारी राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेनंतर तिन्ही भूखंडांसाठी प्रादेशिक योजना २०२१ मधील कलम ३९अ अंतर्गतची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. प्रस्तावांवर सार्वजनिक छाननी घेण्यात आली तसेच टीसीपी मंडळाने त्यांचा विचार केला.

विभागाने ६ मे रोजीच्या अधिसूचनेद्वारे हे प्रस्ताव प्रसिद्ध करून ७ मे रोजीच्या शासकीय राजपत्रात नागरिकांकडून सूचना व हरकती मागवल्या होत्या. त्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली होती. या तीन प्रस्तावांमध्ये मिळून सुमारे ९.७ लाख चौरस मीटर क्षेत्राचा समावेश आहे. त्यापैकी मोठा भाग साओ जॉर्ज बेट परिसरात आहे. येथे ५.३ लाख चौरस मीटर क्षेत्र एनडीए म्हणून निश्चित करण्यात आले आहे.

सिंचन क्षेत्रे, भातशेतीचा समावेश

माजॉर्डा येथील प्रस्तावात एकूण २,५०,४०६ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडाचा समावेश आहे. या भूखंडावर विविध प्रकारचे भू-वापर वर्गीकरण आहे. प्रादेशिक योजनेनुसार, प्रस्तावातील सर्वेक्षण क्रमांकांमध्ये सिंचन क्षेत्रे, वाळूचे ढिगारे, भातशेती, सिंचनाखालील क्षेत्रे, जलाशय आणि वस्तीची जमीन यांचा समावेश आहे. कोन्सुवा येथे टीसीपी विभागाने वसाहत क्षेत्र म्हणून कायम ठेवलेल्या ४४१ चौरस मीटर क्षेत्राचा अपवाद वगळता, एकूण १,९५,४७० चौरस मीटर क्षेत्रापैकी १,९५,०२९ चौरस मीटर क्षेत्र एनडीए म्हणून निश्चित करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT