Sustainable Mining Goa
पणजी : खनिज व्यवसायात पारदर्शकता आणण्यासाठी ई- लिलाव करण्यात येत असून, यापुढे पर्यावरण आणि खनिज उत्खनन यांचा समतोल राखून शाश्वत पद्धतीने खनिज उत्खनन केले जाईल. या क्षेत्रातील समस्या अग्रक्रमाने सोडवण्यात येतील अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.
राज्य सरकारच्या खाण व भूगर्भ संचालनालयाच्या वतीने आयोजित ’गोव्यातील खनिज अन्वेषण : आव्हाने, संधी आणि पुढील दिशा’ या विषयावरील कार्यशाळेचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. खाण मंत्रालयाच्या राष्ट्रीय खनिज अन्वेषण न्यास , भूगर्भशास्त्रीय सर्वेक्षण संस्था , तसेच मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या सहकार्याने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
ते म्हणाले, गोवा ही खाण संपत्तीने भरलेली भूमी असून, येथे शाश्वत आणि पारदर्शक खाण धोरणाद्वारे नव्या युगाची सुरूवात होत आहे. या क्षेत्रातील गुंतवणूक, संशोधन व पर्यावरण संवर्धन यांचा समतोल साधत राज्याच्या प्रगतीसाठी आपण कटिबद्ध आहोत.
सरकारने खाण क्षेत्रासाठी ‘ई-लिलाव पद्धती’ व ‘डंप धोरण’ लागू करून कार्यपद्धतीत पारदर्शकता आणली आहे. भविष्यात दुर्मिळ व अत्यावश्यक खनिजांवरील संशोधनासाठी शैक्षणिक व संशोधन संस्थांशी भागीदारी वाढवली जाणार आहे.
या कार्यशाळेच्या माध्यमातून खाण अन्वेषणातील नव्या संधी, तंत्रज्ञान, आणि पर्यावरणपूरक उपाययोजना यावर विचारमंथन झाले. विविध तज्ज्ञ, संशोधक, शास्त्रज्ञ, आणि धोरणकर्ते या परिषदेत सहभागी झाले होते.
ब्लॉक 1 डिचोली येथील वेदांता कंपनीच्या खाणी मधून उत्खनन सुरू झाले आहे. याशिवाय अडवलपाल थिवी ब्लॉक 5 फोमेंता रिसोर्स कंपनीकडून चालवली जाणारी खाण सुरू झाली आहे. याशिवाय साळगावकर शिपिंग कंपनीला पर्यावरण परवाने मिळाले असून डीजीएमएस कडून मिळणारा सुरक्षेचा परवाना बाकी आहे. त्यामुळे ही खाण महिन्याभरात सुरू होईल.
याशिवाय ब्लॉक 3 शिरगाव मोंत ही बांदेकर ब्रदर्स कडून चालवली जाणारी खाण, ब्लॉक 6 कुडणे जेएसडब्ल्यू कंपनीकडून चालवली जाणारी खाण आणि ब्लॉक 8 थिवी पिर्ण ही ’काय’ या कंपनीकडून चालवल्या जाणार्या खाणींना महत्त्वाचे परवाने मिळाले आहेत. त्यांच्याकडून आवश्यक असलेले आगाऊ रक्कमही भरली आहे.
ही रक्कम साधारणपणे 100 कोटी रुपये असते. त्यामुळे या वर्षाअखेरपर्यंत खाण व्यवसाय सुरळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सरकारच्या खाण आणि भूगर्भशास्त्र खात्याच्या वतीने आतापर्यंत 12 खाणींचा लिलाव पूर्ण केला आहे. यापैकी 6 खाणी या वर्षाअखेरपर्यंत सुरू होतील तर उर्वरित सहा खाणींपैकी ब्लॉक 4 काले, ब्लॉक 8 कुडणे, ब्लॉक 9 सुर्ला, ब्लॉक 3 या खाणी सुरू करण्यासंदर्भात प्रशासकीय पातळीवरची बोलणी पूर्ण झाली आहेत. या खाणींना वन पर्यावरण आणि हवामान बदल याबरोबरच प्रदूषण नियंत्रण विभागाच्या परवानगी मिळण्याच्या मार्गावर आहेत.