

पणजी : सरकारने राज्यातील पर्यटक व उद्योजकांचे हित लक्षात घेऊन जे टॅक्सी अॅग्रीगेटर आणले आहे ते योग्य आहे. सत्ताधारी पक्षाच्या काही आमदारांनी अॅप-आधारित टॅक्सीला विरोध करणार्या टॅक्सी चालकांना पाठिंबा दिला आहे, तर मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी आमदारांना या प्रश्नी तोडगा काढण्याचे आश्वासने दिल्याने टॅक्सी अॅग्रीगेटरबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे. मात्र, सर्वांच्या हिताचा हा निर्णय असल्याने सरकारने त्यातून माघार घेऊ नये, अशी मागणी ट्रॅव्हल अॅण्ड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवा (टीटीएजी) ने केली आहे.
‘टीटीएजी’चे अध्यक्ष जॅक सुखिजा म्हणाले, सरकारने स्थानिक टॅक्सी चालकांना या योजनेचा भाग बनवायचे असल्याने मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. मार्गदर्शक तत्त्वे कशी अंमलात आणायची हे सरकारचे आव्हान आहे. मात्र, सरकारने मार्गदर्शक तत्त्वे रद्द करण्याचा निर्णय घेऊ नये, असेही ते म्हणाले.
ते म्हणाले, मसुदा धोरणानुसार टॅक्सी चालकांना अॅग्रीगेटर प्लॅटफॉर्मवर असण्याचा पर्याय आहे. या मसुद्यावर सूचना देण्याची शेवटची तारीख 19 जून आहे. प्राप्त झालेल्या सूचनांच्या आधारे सरकार निर्णय घेईल. टॅक्सी चालकांनी स्थानिक पातळीवर विकसित केलेल्या ‘अॅप’ला टीटीएजीचा विरोध नाही. टॅक्सीसेवा ही अॅप आधारित असावी हीच आमची मागणी असल्याचे ते म्हणाले.