पणजी ः केंद्र सरकारचे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, युवांचे प्रेरणादायी स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करत आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून गोवा सरकारच्या क्रीडा खात्यातर्फे पणजी येथील कला अकादमीत दि. 1 व 2 डिसेंबर रोजी गोवा राज्य युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती क्रीडामंत्री रमेश तवडकर यांनी बुधवारी पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी क्रीडा संचालक डॉ. अजय गावडे व केंद्रीय संयोजक सुमीत एम. आर. उपस्थित होते.
मंत्री तवडकर म्हणाले, पंतप्रधानांच्या विकसित भारत 2047 च्या मोहिमेत तरुणांना सहभागी करून घेण्याच्या द़ृष्टिकोनाशी सुसंगत असा हा युवा महोत्सव आहे. विकसित भारत चॅलेंज ट्रॅक तरुण सहभागींना प्रशासन, शिक्षण, ऊर्जा, हवामान आणि डिजिटल समावेशन यासारख्या विषयांवर राष्ट्रीय आव्हानांवर कृतिशील उपाय कल्पना मांडण्यासाठी आणि सादर करण्यासाठी जागा प्रदान करेल. यावर्षी राज्य युवा महोत्सव 3 घटकांमध्ये आयोजित केला जाईल. यात सांस्कृतिक ट्रॅक, नवोन्मेष ट्रॅक (विज्ञान मेळा) आणि विकसित भारत चॅलेंज ट्रॅक यांचा समावेश असणार आहे. सांस्कृतिक ट्रॅकमध्ये लोकगीत गट, लोकनृत्य गट, भाषण, कथालेखन, चित्रकला, रांगोळी आणि छायाचित्रण असेल ज्यापैकी लोकगीत गट, लोकनृत्य गट, भाषण, नृत्य लेखन, चित्रकला यातील विजेता राष्ट्रीय स्तरावरील युवा महोत्सवात सहभागी होईल. कथालेखन, रांगोळी, छायाचित्रण आणि नवोन्मेष ट्रॅक हे चार कार्यक्रम फक्त राज्य पातळीवरच संपतील. या स्पर्धांसाठीचे निकष नवी दिल्ली येथील युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने निश्चित केले आहेत. पहिल्यांदाच सहभागींना भाषण, कथालेखन आणि कविता स्पर्धांसाठी कोकणी किंवा मराठी भाषेत प्रवेशिका देण्याची परवानगी असल्याचे मंत्री तवडकर म्हणाले.