

पणजी : शहरांसोबत ग्रामीण भागातील रस्त्यांच्या बाजूला सर्रासपणे वाहने उभी केली जातात. लोक वाहने खरेदी करतात, मात्र ती वाहने ठेवण्यासाठी आपल्या घरी पार्किंगसाठी जागा आहे की, नाही याचा विचार करत नाहीत. त्यामुळे रस्त्याकडेला किंवा नो पार्किंगच्या जागी वाहने ठेवून वाहतुकीला अडथळा केला जातो. राजधानी पणजीमध्येही अनेक रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात वाहने नो पार्किंग झोनमध्ये दिसतात. या प्रकाराकडे वाहतूक पोलिसही दुर्लक्ष करीत आहेत.
दादा वैद्य रस्त्यावर तर अशा प्रकारची नो पार्किंगच्या फलकांच्या बाजूला उभी केलेल्या अनेक वाहने दिसून येतात. निमशहर भागाचा विचार केल्यास अनेक ठिकाणी कॉलनी आहेत, त्या कॉलनीमध्ये प्रत्येक फ्लॅट धारकाला एक चारचाकी व एक दुचाकी ठेवण्यासाठी जागा दिलेली असते. मात्र काही फ्लॅटधारक एकापेक्षा जास्त वाहने खरेदी करून ती रस्त्याच्याकडेला ठेवली जातात. गावातील रस्त्याकडेला तर कारच नव्हे तर ट्रक वगैरे पार्किंगची जागा नसल्यामुळे रस्त्याकडेला ठेवले जातात जे अपघाताला कारणीभूत ठरतात. वाहतुकीच्या कोंडीला कारण ठरतात.
राज्यातील कुठलाही रस्त्याच्या कडेला वाहने दिसून येतात. वाहन मालकाच्या घरी पार्किंगला जागा नसल्यामुळे रस्त्याकडेला वाहनांची गर्दी दिसते. त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि अपघात याला जबाबदार हे वाहन मालक ठरतात. मात्र, अशा वाहन मालकाला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई झालेली दिसत नाही. त्यामुळे वाहने खरेदी करताना पार्किंगच्या प्रथम विचार व्हायला हवा.