Seven houses sewage connections sealed in Goa fields
पणजी : मळा तलावाच्या सभोवती असलेल्या ७ घरमालकांनी बेकायदेशीर सांडपाण्याच्या वाहिन्यांद्वारे थेट तलावात सोडले असल्याची माहिती पणजी महापालिकेने सादर केल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने या सांडपाणी जोडणी सील करण्याचे निर्देश देत पर्यायी व्यवस्था करण्यास सांगितले आहे.
मळा तलावातील प्रदूषणाचा मुद्दा आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम लक्षात घेता न्यायालयाने प्रकरण गांभीर्याने घेतले असून, पुढील सुनावणी ९ जून २०२६ रोजी निश्चित करण्यात आली आहे. या काळात संबंधित यंत्रणांनी केलेल्या कारवाईचा अहवाल न्यायालयासमोर सादर होण्याची शक्यता आहे.
मळा तलावातील मृत माशांच्या घटनेची गंभीर दखल घेऊन गोवा खंडपीठाने स्वेच्छा जनहित याचिका घेतली आहे. मागील सुनावणीवेळी मासळी मृत्यू होण्यामागील कारण मळा तलावात सोडण्यात आलेले सांडपाणी निचरा असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे या तलावाच्या पश्चिम परिसरातील घरांची संयुक्त पाहणी तीन दिवसांत पूर्ण करण्याचे पणजी महापालिका, जलस्रोत व प्रदूषण नियंत्रण मंडळाला आदेश देत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने पुढील सुनावणी १३ जून रोजी ठेवली आहे. त्यानुसार आज सादर करण्यात आलेल्या अहवालात ७ घरमालकांनी थेट सांडपाणी तलावात सोडल्याचे नमूद करण्यात आले आहे.
पणजी महापालिकेने गोवा खंडपीठाला माहिती दिली की या सात घरांतील बेकायदेशीर सांडपाणी जोडण्या आता सील करण्यात आल्या असून, तलावातील प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने कारवाई करण्यात आली आहे. तलावात सांडपाणी मिसळल्याने पाण्याची गुणवत्ता बिघडून मोठ्या प्रमाणात मासे मृतावस्थेत आढळल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सांडपाणी जोडणीसाठी अर्ज करा...
उच्च न्यायालयाने संबंधित घरमालकांना कायदेशीर आणि योग्य सांडपाणी जोडणीसाठी अर्ज करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, तलावात पाणी शिरण्यास कारणीभूत ठरत असलेली खराब झालेली सांडपाण्याची वाहिनीदेखील एका आठवड्याच्या आत दुरुस्त करण्याचे आश्वासन पणजी महापालिकेने खंडपीठाला दिले.