पणजी : विठ्ठल गावडे पारवाडकर
विधानसभा निवडणूक आली की साखळी मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असते. कारण गेल्या दोन निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना काही प्रमाणात संघर्ष करावा लागला होता. त्याला कारणही तसेच होते.
साखळीचे माजी नगराध्यक्ष धर्मेश सगलानी यांनी डॉ. सावंत यांना दोन्ही निवडणुकांमध्ये जोरदार लढत दिली होती. मात्र, २०२२ च्या विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या पालिका निवडणुकीमध्ये साखळी पालिकेत सगलानी यांच्यासह त्यांच्या पॅनलचा पराभव झाला.
एकमेव प्रवीण ब्लेगन हे काँग्रेसचे उमेदवार तेही मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासमोर प्रबळ उमेदवार न दिल्याने जिंकले होते. त्यानंतर सगलानी यांची राजकीय कारकीर्द हळूहळू कमी होत गेली. सध्या त्यांच्या भोवती असलेले वलय जवळपास नाहीसे झाले असल्याने ब्लेगन यांनी काँग्रेस उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
पालिकेत सत्ता नसल्यामुळे सगलानी यांना राजकीय काम करणे बरेच कठीण बनले असून काँग्रेस पक्षाच्या संघटनेमध्येही ते सक्रिय दिसत नाहीत. दुसरे मजबूत उमेदवार विरोधकांकडे नाहीत. त्यामुळे येत्या निवडणुकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमोर विरोधकांना उमेदवार शोधावा लागणार आहे.
साखळी पालिकेवर यापूर्वी मुख्यमंत्र्यांचे एक किंवा दोनच समर्थक नगरसेवक निवडून यायचे. यावेळी पालिकेत त्यांच्या पॅनलची सत्ता आहे. साखळी मतदारसंघामध्ये येणाऱ्या पाळी, नावेली, आमोणा, कुडणे, वेळगे व हरवळे या पंचायत क्षेत्रांमध्ये मुख्यमंत्र्या डॉ. प्रमोद सावंत यांना भरघोस मतांची आघाडी मिळायची.
मात्र, साखळी पालिकेमध्ये त्यांच्या गटाची सत्ता नसल्याने पालिका क्षेत्रात डॉ. सावंत यांना कमी मते मिळत होती. यावेळी पालिकेवर त्यांचे वर्चस्व असल्यामुळे व त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा फायदा साखळी पालिका क्षेत्रासह पंचायत क्षेत्रांना करून दिलेला असल्याने, अनेक विकास प्रकल्प व योजना सुरू झाल्यामुळे डॉ. सावंत हे सेफ असल्याचेच म्हणावे लागेल.
काँग्रेस पक्षाने डिचोली व सत्तरी तालुक्यातील मतदारसंघात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी जास्त प्रयत्न केलेले नाहीत. त्यामुळे या पक्षाकडे तगडे नेतृत्व तयार होताना दिसत नाही. काँग्रेस काळात इतर पक्षांचे इथे तेवढे काम नाही. फक्त निवडणुका जवळ आल्यानंतरच साखळी किंवा इतर मतदारसंघात काँग्रेस जागृत होते. त्याचा फटका त्यांना निवडणुकीत बसतो.
काही मतदारसंघातील लोकांना त्यांचे आमदारही भेटत नाहीत, अशी स्थिती असताना मुख्यमंत्री डॉ. सावंत दर शनिवारी रवींद्र भवनमध्ये भेटतात, तसेच निवासस्थानीही आलेल्या लोकांची भेट घेतात. लोकांच्या समस्या सोडवतात. त्यामुळे लोकांना दिलासा मिळताना दिसत आहे. हा जनता दरबार डॉ. सावंत यांच्यासाठी जमेची बाजू ठरणार आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे गेली सात वर्षे मुख्यमंत्री असल्यामुळे स्मार्ट पणजीच्या धर्तीवर त्यांनी साखळी पालिका क्षेत्र स्मार्ट करण्यास सुरुवात केली आहे. सिमेंट काँक्रीटचे रस्ते बांधण्यास सुरुवात झालेली असून हरवळेपासून हे काम सुरू झालेले दिसते. सांडपाणी प्रकल्प व रस्ते यावर काम सुरू असून येत्या वर्षभरात साखळी स्मार्ट झालेली दिसेल.
साखळी मतदारसंघामध्ये साखळी पालिका असल्यामुळे पाळी ही एकमेव जिल्हा पंचायत आहे, त्यासोबतच मतदारसंघातील कुडणे पंचायत ही कारापूर सर्वण या जिल्हा पंचायतीमध्ये येते. या दोन्ही जि. पं. वर भाजपचे सुंदर नाईक व महेश सावंत हे विजयी झालेले आहेत.
२०२२ विधानसभा निवडणूक निकाल
डॉ. प्रमोद सावंत (भाजप - विजयी) : १२,२५०
धर्मेश सगलानी (काँग्रेस) : ११,५८४
सुजय गावस (आरजीपी) : ७४२
महादेव खांडेकर (मगो) : ३७०
मनोजकुमार घाडी (आप) : १०१
जि. पं. निकाल : पाळी जि. पं.
सुंदर नाईक (भाजप - विजयी) : १०,२१४
भानुदास सोन्नलाईक (काँग्रेस) : १,६३३