CM Pramod Sawant pudhari photo
गोवा

CM Pramod Sawant | साखळीत आरोग्यसेवेचा नवा अध्याय! लवकरच आयुर्वेद आणि नॅचरोपॅथी इस्पितळ उभारणार

CM Pramod Sawant | मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : हरवळे-साखळीत नॅचरोपॅथी ओपीडीचे उद्घाटन; सर्व प्रकारचे उपचार होणार

पुढारी वृत्तसेवा

साखळी : पुढारी वृत्तसेवा

साखळीत साकारण्यात आलेले हे गोव्यातील पहिले व देशातील २६ वे नॅचरोपॅथी महाविद्यालय आहे. आज गोव्यातील या महाविद्यालयात ओपीडीची सुरुवात करीत असून, या ओपीडीत नॅचरोपॅथी उपचार पद्धतीतील सर्व प्रकारचे उपचार व क्रिया केल्या जातील. याच ओपीडीतून या सर्व प्रकारच्या उपचार पद्धतींचे प्रशिक्षण व अनुभव डॉक्टर्स व इतर प्रशिक्षणार्थ्यांना मिळाल्यानंतर लवकरच साखळीत नॅचरोपॅथी व आयुर्वेदिक ५० खाटांचे इस्पितळ साकारण्यात येणार आहे.

जेणेकरून समाधानकारक दरांत या उपचार पद्धतीतील रुग्णांना भरती करून घेत उपचार करणे फायदेशीर ठरणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे केले. हरवळे-साखळी येथे मातोश्री पद्मिनी शैक्षणिक संस्थेच्या फिजिओथेरपी व नॅचरोपॅथी महाविद्यालयात नॅचरोपॅथी दिनानिमित्त नॅचरोपॅथी ओपीडीचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री सावंत बोलत होते. यावेळी साई नर्सिंग इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष पांडुरंग कुटीकर, मातोश्री पद्मिनी शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षा सुलक्षणा सावंत, सीईओ डॉ. स्नेहा भागवत व इतरांची उपस्थिती होती. भारतीय औषध पद्धती या माध्यमातून आयुर्वेद, ॲलोपॅथी, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी, योगिक सायन्स या सर्व पदवी अभ्यासक्रमांसाठी गोवा विद्यापीठ व आयुष मंत्रालयाच्या आयुष कौन्सिल यांच्याशी संलग्न करून हे महाविद्यालय सुरू केले आहे.

या महाविद्यालयात मिळणारे शिक्षण व प्रशिक्षण यामुळे येणाऱ्या काळात गोव्यात या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी आम्ही तयार करू शकणार, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी फित कापून व समई प्रज्वलित करून नॅचरोपॅथी ओपीडीचे उद्घाटन केले.

या नॅचरोपॅथी ओपीडी व डे केअर सेंटरमध्ये नॅचरोपॅथी व योग, फिजिओथेरपी, आयुर्वेद, फर्टिलिटी उपचार व गर्भसंस्कार, नेफ्रोलॉजी, ऑर्थोपेडिक्स, समुपदेशन, शस्त्रक्रिया, निदान सेवा, पॅथॉलॉजी व एक्स-रे यावर तपासणी, मार्गदर्शन व औषधोपचार होणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT