पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील हॉट रस्ते मिक्सिंग केल्यानंतर दुसरी एजन्सी येते आणि चांगले रस्ते खोदते खोदलेले हे दुरुस्त केले जात नाहीत. राज्यात असे प्रकार सर्रास घडतात. त्यावर नियंत्रण आणा, अशी मागणी आमदार दाजी साळकर यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला केली. रस्ते खोदकामाचे प्रकार थांबविण्यासाठी मुख्य अभियंत्यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
त्यामुळे वारंवार रस्ते खोदले जाणार नाहीत, असे उत्तर सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत यांनी दिले. मंत्री कामत म्हणाले, सार्वजनिक बांधकाम खाते रस्ते करते. मात्र, पाण्याची पाईपलाईन, भू वीज वाहिन्या, सांडपाणी पाईप लाईन व केबल्स टाकण्यासाठी संबंधित खाती रस्ते फोडतात.
काहीवेळी त्यासाठी परवानगी घेतली जात नाही. सार्वजनिक बांधकाम खाते रस्ते करण्यापूर्वी वरील खात्यांना तुमचे काही काम आहे का म्हणून विचारते. त्याला काही खाती उत्तरच देत नाहीत आणि रस्ते फोडतात. यापुढे असे होऊ नये, यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंत्याच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली असून या समितमध्ये सिवरेज, पेय जल पुरवठा आणि वीज पुरवठा खात्याच्या अभियंत्यांचा समावेश आहे.
ही समिती रस्ते खोदण्याबाबत सुसुत्रता आणेल. अभियंता संबंधित खात्याला पत्र लिहितील. त्याला उत्तर न दिल्यास त्या खात्याला जबाबदार धरले जाईल, असेही कामत म्हणाले.
एआयचा वापर करा : आलेमाव आमदार विजय सरदेसाई यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याने स्थापन केलेल्या समितीमध्ये टेलिकॉम आणि गॅस पुरवठा करणाऱ्या सदस्यांचाही समाविष्ट करावा. युटिलिटी कॉरिडॉर करून त्याच्यातूनच विविध पाईप लाईनचे प्रकल्प पूर्ण करा, अशी सूचना केली. तर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी या समस्येवर एआय तंत्रज्ञाचा वापर करून तोडगा काढण्याची सूचना केली.