Accident News file photo
गोवा

Goa Road Accidents | राज्यात पादचाऱ्यांच्या मृत्यूत घट; मात्र सायकलस्वारांच्या मृत्यूत वाढ

Goa Road Accidents | नऊ महिन्यांत 1,965 रस्ते अपघात; 201 जणांचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यात २०२६ च्या पहिल्या नऊ महिन्यांत रस्ते अपघातांची संख्या वाढली असली, तरी पादचाऱ्यांच्या मृत्यूत ३३ टक्क्यांनी घट झाली आहे. याच कालावधीत सायकलस्वारांच्या मृत्यूत तब्बल २०० टक्क्यांची वाढ झाली आहे. गोवा पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर २०२६ अखेर राज्यात एकूण १,९६५ रस्ते अपघात झाले.

गेल्या वर्षी याच कालावधीत १,७२६ अपघातांची नोंद झाली होती. त्यामुळे अपघातांमध्ये सुमारे १३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सप्टेंबरपर्यंतच्या अपघातांत २०१ जणांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षी याच कालावधीत १९६ जणांचा मृत्यू झाला होता.

त्यामुळे मृतांच्या संख्येतही ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. प्राणघातक अपघातांच्या संख्येत मात्र केवळ १ टक्क्यांची वाढ झाली आहे. यंदा सप्टेंबरपर्यंत रस्ते अपघातांत ३० पादचाऱ्यांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा ४५ होता. त्यामुळे पादचाऱ्यांच्या मृत्यूत ३३ टक्क्यांनी घट झाली आहे.

अपघातप्रवण भागांवर लक्ष देण्याची गरज

राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग तसेच इतर प्रमुख रस्त्यांवर पोलिसांची दृश्यमान उपस्थिती, कडक अंमलबजावणी आणि प्रभावी वाहतूक नियंत्रण यामुळे अपघात तसेच वाहतूक कोंडी कमी होऊ शकते. वाहतूक पोलिसांनी केवळ दंड किंवा चलनांची संख्या वाढवण्याऐवजी अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या वाहतूक नियमांच्या उल्लंघनांवर कारवाई करण्यास प्राधान्य देण्याची गरज असल्याचे मत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

यंदा दोन सायकलस्वारांचा अपघाती मृत्यू झाला, तर गेल्या वर्षी एकाही सायकलस्वाराचा मृत्यू झाला नव्हता. त्यामुळे टक्केवारीच्या दृष्टीने सायकलस्वारांच्या मृत्यूत २०० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. अपघातांमध्ये प्रवाशांच्या मृत्यूची संख्या वाढली आहे. गेल्या वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत चार प्रवाशांचा मृत्यू झाला होता, तर यंदा हा आकडा १२ वर पोहोचला आहे. मागे बसलेल्या प्रवाशांच्या मृत्यूतही ९ टक्क्यांनी वाढ झाली असून, मृतांची संख्या २१ वरून २३ झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT