• ११ महिन्यांत राज्यात २२९ जीवघेणे अपघात घडले
• अपघातांत २३८ जणांचा मृत्यू; दुचाकीस्वार सर्वाधिक
• ५३ पादचारी, २८ दुचाकी प्रवासीही मृतांमध्ये
• नियमभंग रोखण्यासाठी शहरांमध्ये एआय कॅमेरे बसवणार
पणजी : प्रभाकर धुरी
राज्यात अपघातांची मालिका थांबायचे नाव घेत नाही. अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिस विविध उपाय करीत असतानाही राज्यात जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांच्या कालावधीत २२९ प्राणघातक अपघात घडले आहेत.
या अपघातांमध्ये एकूण २३८ जणांवा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत प्राणघातक अपघात आणि मृत्यूचे प्रमाणे कमी असले तरी राज्यातील अपघातांची स्थिती चिंताजनक आहे. पोलिसांनी जाहीर केलेल्या अहवालानुसार, राज्यात गेल्या अकरा महिन्यांमध्ये २१२० अपघातांची नोंद झाली आहे. त्यामध्ये २२९ जीवघेणे अपघात होते.
२०६ अपघातात वाहनस्वार किंवा अन्य गंभीर जखमी झाले. तर ३८७ अपघातात चालक किंवा अन्य किरकोळ जखमी झाले. इतर १२९८ अपघातांचा समावेश आहे. ज्यामध्ये कुणालाही दुखापत झाली नाही. प्राणघातक अपघातांमध्ये २३८ जणांचा मृत्यू झाला आहे.
त्यामध्ये १६७ दुचाकीस्वारांचा समावेश आहे. यात १३९ दुचाकीस्वार चालक तर दुचाकीच्या मागे बसलेल्या २८ जणांचा समावेश आहे. शिवाय इतर ८ वाहन चालक, ५३ पादचारी, एक सायकलस्वार आणि इतर तिघांचा अपघाती मृत्यू झाला आहे
शहरांमध्ये एआय कॅमेरे बसविणार...
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी अपघातांमध्ये घट झाली ही वस्तुस्थिती आहे. वाहतूक पोलिस आणि वाहतूक खात्याने वर्षभरात राबवलेल्या जागृतीचा तो परिणाम आहे. राज्यात नियमभंग करून वाहने चालविण्याचे प्रमाण अजूनही कायम आहे. त्यावर विविध प्रकारचे उपाय करण्यात येत आहे. काही ठिकाणी एआय कॅमेरे अलोक कुमार बसविण्यात आले आहेत. हे कॅमेरे राज्यातील सर्व शहरांमध्ये बसविण्याचे नियोजन असल्याची माहिती पोलिस महासंचालक अलोक कुमार यांनी दिली.
14.60 कोटी दंड वसूल
नोव्हेंबरपर्यंत मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या १ लाख ९६ हजार ४३७ वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई केली. या उल्लंघनकर्त्यांकडून १४ कोटी ५९ लाख २९ हजार ६०० रुपये दंडात्मक रक्कम वसूल केली. तर गेल्यावर्षी ३.८० वाहनस्वारांकडून २३.१७ कोटी रुपये दंडात्मक रक्कम वसूल केली होती.