पणजी : राज्यातील सर्व आठही जलमार्गांवर जुन्या फेरी बोटींच्या जागी नव्या पर्यावरणपुरक रो-रो फेरी बोटी सुरू करण्यात येतील अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. राज्यातील जलवाहतुकीला गती देणारा आणि पर्यावरणपूरक प्रकल्पाचा आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
चोडण–रायबंदर या प्रमुख जलमार्गावर 'गंगोत्री' आणि 'द्वारका' या दोन नव्या फेरी बोटी आज सुरू करण्यात आल्या. यावेळी अंतर्देशीय जलमार्ग (वॉटरवेज) मंत्री सुभाष फळदेसाई, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे, आमदार प्रेमेंद्र शेट आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
या दोन्ही बोटी सार्वजनिक-खाजगी भागीदारी मॉडेल ( पीपीपी )अंतर्गत कार्यरत असणार असून, राज्यातील जुन्या पारंपरिक फेरीबोटी हटवून सर्व मार्गांवर अशाच आधुनिक रो-रो फेरी तैनात करण्याचा सरकारचा मानस आहे, गोवा ही हरित राज्य म्हणून ओळख निर्माण करत आहे. जुन्या डिझेलवर चालणाऱ्या बोटींच्या तुलनेत या नव्या फेरींमुळे शून्य कार्बन उत्सर्जन होणार असून, त्या पर्यावरणासहित प्रवाशांसाठीही सुरक्षित आणि वेगवान असतील. यामुळे गोव्याची जलवाहतूक प्रणाली अधिक शाश्वत आणि आधुनिक होणार आहे, असेही ते म्हणाले.