पणजी : पुढारी वृत्तसेवा
रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्षाध्यक्ष मनोज परब यांच्या राजीनाम्यानंतर पक्षातील मतभेद तीव्र झाले असून, त्यांच्याविना पक्ष पदाधिकारी आणि आमदार वीरेश बोरकर यांची पहिली बैठक या आठवड्यात घेण्यात येणार असल्याची माहिती खजिनदार अजय खोलकर यांनी दिली.
यातच पक्षाच्या सीईसी व्हॉटस्अॅप गटातील चॅट व्हायरल झाल्याने राज्यभरात पुन्हा खळबळ माजली आहे. खोलकर यांनी दिलेल्या माहिती नुसार, मडगाव येथील बैठकीबाबत आमदार वीरेश बोरकर यांची अधिकृत पक्ष बैठकीत चौकशी करण्यात येणार आहे. बोरकर यांना बाजू मांडण्या साठी विशेष संधी दिली आहे.
दरम्यान, पक्षाध्यक्ष पदासंदर्भातील प्रश्नही चर्चेतून सोडवले जातील, असे संकेत खोलकर यांनी दिले. मात्र, पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणी समूहा-तील व्हॉटस्अॅप संदेशाचा स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर परिस्थिती गुंतागुंतीची बनली आहे. या संदेशात आमदार बोरकर यांच्याविरोधात मनोज परब आणि इतर सदस्यांच्या टिप्पण्यांचा समावेश आहे. या चॅट्स-बाबत खोलकर यांनी हा पक्षाचा अंतर्गत विषय असल्याचे म्हटले असून, स्पष्टीकरण देण्यापूर्वी पक्षां-तर्गत चर्चा करू, असे स्पष्ट केले.
अस्तित्वाची लढाई
एकेकाळी गोव्यात पर्यायी राजकारणाचा चेहरा म्हणून उदयास आलेल्या आरजीसमोर आता स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षातील वाढता संघर्ष आणि नेतृत्वावरील प्रश्नचिन्ह यामुळे कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी काळात पक्ष एकसंध राहणार की फुटीच्या दिशेने वाटचाल करणार, हा प्रश्न आता अधिक तीव्रतेने उपस्थित होत आहे.
उद्या होणार बैठक
आरजीचे माजी अध्यक्ष मनोज परब व आमदार वीरेश बोरकर यांच्यात झालेल्या वादानंतर आमदार बोरकर यांची बाजू ऐकून घेण्यासाठी केंद्रीय समितीने शनिवारी ३० मे रोजी सायं. ६ वा. ३० मि.नी पक्ष कार्यालयात बैठकीचे आयोजन केले आहे. ही माहिती पक्षाचे सरचिटणीस विश्वेश बोरकर यांनी म्हटले आहे. दरम्यान, या बैठकीचे निमंत्रण किमान एक दिवस अगोदर द्यावे, असे आवाहन आमदार बोरकर यांनी केले होते. त्यामुळे या बैठकीला आमदार बोरकर उपस्थित राहण्याची अशी शक्यता आहे.