Road Accident Death  pudhari photo
गोवा

Goa Road Accident Case | रस्ते अपघातांच्या प्रमाणात गोवा देशात नंबर 1; दर लाख लोकसंख्येमागे तब्बल 169 अपघात!

Goa Road Accident Case | एक लाख लोकसंख्येमागे १६९ अपघात; पाठोपाठ केरळ, तमिळनाडू राज्ये

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
रस्ता अपघातांच्या प्रमाणात गोवा देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये अव्वल ठरला आहे. २०२४ मध्ये गोव्यात दर लाख लोकसंख्येमागे तब्बल १६९ रस्ता अपघात नोंदवले गेले. केरळमध्ये १३६, तर तमिळनाडूमध्ये ८८ अपघात प्रति लाख लोकसंख्या नोंदले गेले.
वाहनांची एकूण संख्या लक्षात घेता गोवा देशात सर्वाधिक अपघात असलेल्या राज्यांमध्ये नसला, तरी नोंदणीकृत वाहनांच्या तुलनेत अपघातांचे प्रमाण दर लाख वाहनांमागे २३२ इतके असून गोवा पहिल्या पाच राज्यांमध्ये आहे.

ही माहिती 'क्लायमेट डॉट' या ना-नफा संशोधन संस्थेने संकलित केलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे. संस्थेने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या २०२४ मधील आकडेवारीसह वाहन मालकीची माहिती आणि २०१९ च्या राष्ट्रीय लोकसंख्या अंदाजाचा आधार घेतला आहे. गोव्यात रस्ते अपघातांमध्ये दुचाकीस्वारांचा मोठा वाटा असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.


जुलै २०२६ पर्यंत १५१ प्राणघातक अपघातांमध्ये १५७ जणांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी तब्बल ९५ जण दुचाकीस्वार होते. याशिवाय २३ पादचारी, १७ कारचालक तथा प्रवासी, १० चालक, ८ प्रवासी आणि दोन सायकलस्वारांसह अन्य दोन जणांचा मृत्यू झाला आहे. रस्त्यांची खराब स्थिती, वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि निष्काळजी वाहनचालक हे अपघातांचे प्रमुख कारण असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

प्रभावी जनजागृतीची गरज

दारू पिऊन वाहन चालवणे, हेल्मेट न घालता दुचाकी चालवणे, परवाना नसताना वाहन चालवणे, बेदरकारपणे वाहन चालवणे आणि अतिवेगाने वाहन चालवणे यावर विशेष लक्ष केंद्रित करून वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. मात्र, अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक नियमांची अधिक प्रभावी अंमलबजावणी आणि जनजागृतीची गरज आहे.

४२ टक्के घरांमध्ये चारचाकी वाहन

दरम्यान, गोवा घरगुती वाहनांच्या उपलब्धतेतही देशात आघाडीवर आहे. राज्यातील सुमारे ९० टक्के घरांमध्ये दुचाकी, तर ४२ टक्के घरांमध्ये चारचाकी वाहन असल्याचे आकडेवारी नोंद करण्यात आले आहे. क्लायमेट डॉटने गोव्यातील ऊर्जा संक्रमाणासाठीही डेटा-आधारित विश्लेषण आणि नियोजनावर भर दिला असून, राज्यातील संबंधित यंत्रणांसोबत प्रत्यक्ष पातळीवरील हवामानविषयक उपाययोजनांच्या चाचण्या आणि अंमलबजावणीवर काम करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT