पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोवा कर्मचारी निवड आयोगाने हल्लीच पुरुष व महिला पोलिस उपनिरीक्षक पदासाठी शारीरिक चाचणी घेतली. मात्र, महिलांच्या १०० मीटर धावण्याची पूर्वीची वेळ कमी केल्याने तसेच पुरुषांच्या उंच व लांब उडीचे अंतर वाढवल्याने संगणक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व शारीरिक चाचणीला पात्र ठरलेल्या तब्बल ५६८ उमेदवारांनी शारीरिक चाचणीकडे पाठ फिरवली. यात १२७ महिला व ४४१ पुरुष उमेदवारांचा सहभाग आहे.
कर्मचारी भरती आयोगाने पोलिस उपनिरीक्षक भरतीचा निकाल जाहीर केला आहे. त्यानुसार ३० जागांसाठी घेतलेल्या महिली उपनिरीक्षक परीक्षेत ५७० पैकी केवळ १४ महिला पात्र झाल्या. अनेक महिला उमेदवार सुरुवातीलाच १०० मीटर धावताना मायक्रो सेकंदाने अपात्र ठरल्या. आयोगाने विविध संगणक परीक्षांनंतर शारीरिक चाचणीसाठी ५७० महिलांची निवड केली होती. यातील १२७ गैरहजर राहिल्या.
१४ पात्र झाल्या व उर्वरितांना १०० मीटर धावण्याची वेळ अडीच सेकंदाने कमी केल्यामुळे अपात्र व्हावे लागले. त्याचप्रमाणे २, २७९ पुरुष उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी १,३८९ अपात्र ठरले, ४४१ अनुपस्थित राहिले आणि ४४९ जणांनी या चाचणी उत्तीर्ण केली. पुरुष उमेदवारांसाठी १०० मीटर धावण्याची वेळ बदलली नव्हती. केवळ महिलांची धावण्याची वेळ बदलली होती.
महिलांसाठी निकष...
१०० मीटर धावणे जे १६.५ सेकंदांत पूर्ण करायचे होते. या निकषांव्यतिरिक्त उमेदवारांना तीन संधींमध्ये लांबडडी (३. २५ मीटर), तीन संधींमध्ये गोळाफेक (४ किलो) ४.५० मीटर दूर, तीन संधींमध्ये उंच उडी (१.०५ मीटर) तर २०० मीटर धावणे ३६.० सेकंदांत पूर्ण करावे लागणार होते. यापैकी काही निकषांमध्ये अनेक उमेदवार अनुत्तीर्ण झाले.
पुरुषांसाठी निकष...
पुरुष उमेदवारांसाठी किमान उंची १६८ सेमी आणि अर्ध-उपक्रम उमेदवारांसाठी किमान उंची १६७ सेमी होती. अन्य अटींमध्ये छातीचा विस्तार न झालेला ८० सेमी आणि विस्तारलेला ८५ सेमी, १५ सेकंदांत १०० मीटर धावणे; लांब उडी ३.८० मीटर (तीन संधी), गोळाफेक (७.२६ किलो) ५.६० मीटर (तीन संधी); उंच उडी १.२० मीटर (तीन संधी) आणि ८०० मीटर धावणे ३६ सेकंदांत अशी वेळ होती.