goa assembly winter session  Pudhari
गोवा

Ponda Goa Assembly Election 2026 | फोंड्यात राजकीय पक्षांकडून घेतला जातोय कानोसा

Ponda Goa Assembly Election 2026 | डॉ. केतन भाटीकर यांच्या अकाली निधनामुळे बदलली राजकीय समीकरणे

पुढारी वृत्तसेवा

फोंडा : पुढारी वृत्तसेवा

फोंड्यातील पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी दाखल करून मतदारांवर प्रभाव टाकलेले डॉ. केतन माटीकर यांच्या आकस्मिक निधनामुळे ड फोंड्यातील राजकीय समीकरणच बदलले आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत नेमके राजकीय चित्र काय असू शकते याचा कानोसा सर्वच राजकीय पक्षांकडून घेतला जात आहे.

तत्पर सेवा आणि धडपड्या वृत्तीमुळे फॉड्यातील राजकारणात स्वतःचे स्थान निर्माण केलेल्या केतन भाटीकर यांच्या निधनामुळे फोंड्यातील राजकीय क्षेत्राला जबरदस्त धक्का बसला असून केतन भाटीकर यांची जागा कोण घेऊ शकेल यासंबंधी फोंड्यात चर्चा होताना दिसत आहे. एका अर्थाने भाजपाचा प्रबळ प्रतिस्पर्धी गेला असला तरी सत्ताधारी अजूनही डेंजर झोनमध्ये आहेत, अशी राजकीय चर्चा सुरू आहे.

फोंड्यातील राजकारणात भाजप, मगो, काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि रिव्होल्यूशनरी गोवन्स या पाच राजकीय पक्षांचा बोलबाला असून पुढील निवडणुकीची व्यूहरचना सध्या सुरू आहे. सद्यस्थितीत आपची साथ काँग्रेसला मिळाली तरीही ती काँग्रेससाठी जमेची बाजू ठरू शकते. फक्त काँग्रेस आणि आपमध्ये मनोमीलन व्हायला हवे. दुसऱ्या बाजूने भाजपा आणि मगो यांच्यात सख्य आहेच.

आता असंतुष्टांच्या नाकदुऱ्या काढल्या तर भाजप मगो युती फोंड्यावर प्राबल्य मिळवू शकते. काँग्रेसकडून राजेश वेरेकर यांना प्राधान्य ! फोंड्यातील काँग्रेसचे एक बडे नेते स्वी नाईक यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला होता आणि स्वतःच्या हिमतीवर फोंड्यात भाजपाचे कमळ फुलवले होते.

रवी नाईक काँग्रेस सोडून गेल्यानंतर काँग्रेसमध्ये नेताच शिल्लक नव्हता, अशा वेळेला राजेश वेरेकर यांनी काँग्रेसचे फोंड्यातील तारू सांभाळले होते. राजेश वेरेकर यांनी मागच्या दोन विधानसभा निवडणुकांत बऱ्यापैकी मते मिळवून आपले राजकीय प्राबल्य सिद्ध केले होते. केतननंतर काँग्रेस राजेश वेरेकर यांनाच प्राधान्य देईल यात कोणतीही शंका नाही. मात्र, भाटीकर यांचे कार्यकर्ते आणि समर्थक वेरेकर यांनी आपल्याकडे वळवले तर काँग्रेसला नक्कीच अच्छे दिन येतील.

मगोची सावध भूमिका...

राज्यातील येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि मगो पक्षाची युती असेल हे नक्की. २०१२ च्या निवडणुकीत भाजप-मगो युती होती त्यावेळेला मगोचे लवू मामलेदार निवडून आले होते. आता युतीतील मगोला फोंडा मतदारसंघ सोडला तर मगो पक्षातर्फे या पक्षाचे बडे नेते सुदिन ढवळीकर फोंड्यातून निवडणुकीत उतरतील आणि मडकईत सुदिन यांचे पुत्र मिथिल ढवळीकर उमेदवारी दाखल करतील असा राजकीय अंदाज आहे. राजकीय क्षेत्रात सुदिन ढवळीकर यांना बऱ्यापैकी जनमत असल्याने सुदिनच्या जोरावर मगो फोंड्यात बाजी मारू शकतील, असा राजकीय अंदाज आहे.

भाजपचा उमेदवार कोण?

गेल्या पोटनिवडणुकीत फोंड्यातून भाजपची उमेदवारी दाखल करण्यात सत्ताधाऱ्यांनी बराच वेळ काढला होता. यावेळेला रवी पुत्र रितेश नाईक की विश्वनाथ दळवी अशा द्विधा मनस्थितीत भाजप सापडला होता. ऐनवेळी रितेश नाईक यांना उमेदवारी दिल्यानंतर विश्वनाथ दळवी यांनी बंड पुकारले होते त्यावेळेला मुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्षांना धावाधाव करावी लागली होती. आता पुन्हा एकदा २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपतर्फे कोण, हा प्रश्न उपस्थित होणार हे नक्की

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT