Goa Police suspension AI Photo
गोवा

Goa Police suspension: भ्रष्टाचार अन् गैरवर्तन... गोवा पोलीस दलातील ५ कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन; नक्की काय घडलं?

गैरवर्तन, भ्रष्टाचार आणि सेवाशिस्तीचे उल्लंघन केल्याच्या आरोपांवरून गोवा पोलीस खात्याने पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

पुढारी वृत्तसेवा

Goa Police suspension

पणजी : गैरवर्तन, भ्रष्टाचार आणि सेवाशिस्तीचे उल्लंघन केल्याच्या आरोपांवरून गोवा पोलीस खात्याने पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. मंगळवारी विधानसभेत आमदार कार्लोस फेरेरा यांनी भ्रष्ट पोलीस कर्मचाऱ्यांचा पर्दाफाश केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार ही तडकाफडकी कारवाई करण्यात आली. "पोलीस खात्यातील गैरप्रकार कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत," असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेड क्लार्क मुकुंद मेणकुरकर (लामगावकर) यांना निलंबित करण्यात आले असून त्यांच्याविरोधात विभागीय कारवाई सुरू करण्यात आली आहे. विभागीय चौकशीला सामोरे जाणाऱ्यांना त्यांच्या पत्नीमार्फत (ज्या एलआयसी एजंट आहेत) एलआयसीच्या पॉलिसीज घेण्यास प्रवृत्त केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यूडीसी प्रताप सावंत यांनाही निलंबित करण्यात आले असून त्यांच्याविरोधात खात्यांतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे. गृहरक्षकांना नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देऊन पैसे घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

पर्वरी पोलीस ठाण्यात सध्या कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल गौरेश गावस यापूर्वी वाळपई पोलीस ठाण्यात नियुक्त होते. वाळपई येथे कार्यरत असताना त्यांच्या ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता बाळगल्याचा आरोप झाल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्याशी संबंधित आणखी एका तक्रारीची भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडे स्वतंत्र चौकशी सुरू आहे.

पोलीस कॉन्स्टेबल सुमेश मांद्रेकर यालाही निलंबित करण्यात आले आहे. कोलवाळ पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्यामध्ये त्याचा कथित सहभाग असल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. हा गुन्हा एन.डी.पी.एस. कायद्याच्या कलमांअंतर्गत नोंदवण्यात आला असून संबंधित कॉन्स्टेबलविरुद्ध न्यायालयीन आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

पर्वरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विराज सावंत यांची आल्तिनो येथील गोवा राखीव पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. हॉटेल कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून त्यांच्याविरोधात पुढील विभागीय कारवाई सुरू करण्यात आली आहे.

पोलीस महासंचालकांनी स्पष्ट केले की, "गैरवर्तन, भ्रष्टाचार आणि सेवाशिस्तीचे उल्लंघन अजिबात सहन केले जाणार नाही. कायदा, सेवा नियम किंवा पोलीस दलातील सदस्यांकडून अपेक्षित असलेल्या आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्याविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT