पणजी : एका वर्षापूर्वी दोनापावला व म्हापसा परिसरात घडलेल्या दरोड्यातील सहा बांगलादेशी संशयितांना ताब्यात घेण्यासाठी क्राईम ब्रैचचे विशेष पथक दिल्लीकडे रवाना झाले आहे. तेथील सर्व प्रक्रिया पूर्ण करून या दरोडेखोरांना गोव्यातील दोन दरोडा प्रकरणाच्या चौकशीसाठी येत्या गुरुवारपर्यंत गोव्यात आणले जाणार आहे. या पथकामध्ये दोन पोलिस निरीक्षकांसह सुमारे २२ पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
या दोन्ही दरोड्याच्या प्रकरणांना वर्ष उलटून गेले आहे. क्राईम ब्रँचकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आल्यापासून दरोडेखोरांचा शोध व तसेच त्यांच्या हालचालींवर नजर ठेवली होती. गोवा पोलिसांच्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी या दरोडेखोरांना त्यांच्यात झालेल्या चकमकीनंतर अटक करण्यात यश मिळवले होते.
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस निरीक्षक दत्तगुरू सावंत आणि किशोर रमणन यांच्या नेतृत्वाखालील पथक राजधानी एक्स्प्रेसने दिल्लीकडे रवाना झाले असून, गुरुवारी आरोपींना ताब्यात घेऊन गोव्यात परतण्याची अपेक्षा आहे. मंगळवारी दिल्लीत पोहोचल्यानंतर आरोपींच्या हस्तांतरण व टान्झिट रिमांडची प्रक्रिया पर्ण केली जाईल. त्यानंतर बुधवारी आरोपींसह पथक गोव्याकडे रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी येथे पोहोचेल, असे सूत्रांनी सांगितले.
एप्रिल २०२५ मध्ये दोना पावला येथे वृद्ध दाम्पत्य जयप्रकाश आणि पद्मिनी धेंपो यांच्या घरी झालेला शस्त्रधारी दरोडा तसेच ऑक्टोबर २०२५ मध्ये म्हापसा येथील गणेशपुरी भागातील डॉक्टरांच्या घरी झालेल्या दरोड्यात संशयितांचा सहभाग आहे. दिल्ली क्राइम ब्रँचने दिलेल्या माहितीनुसार, सुमन हौलधर ऊर्फ पन्नू (वय ३५), सैफुल इस्लाम (३१), सोहेल शेख (३५), एम. डी. नासीर (४८) नर इस्लाम उर्फ नदिम खान (५६) आणि जाकीर (४०) यांना १४-१५ एप्रिलच्या मध्यरात्री सराय काले खान परिसरात झालेल्या चकमकीनंतर अटक करण्यात आली.
या कारवाईदरम्यान चार देशी बनावटीच्या बंदुका, दारूगोळा तसेच घरफोडीची साधने जप्त करण्यात आली. शाकायत आणि इलियास हे दोघे संशयित पळून जाण्यात यशस्वी झाल्याचेही समोर आले आहे. दिल्ली क्राइम ब्रँचच्या माहितीनुसार, ही टोळी गोवा आणि इतर राज्यांमध्ये नोंद असलेल्या किमान १४ गुन्ह्यांशी संबंधित आहे. यात खून, दरोडा, खुनाचा प्रयत्न आणि घरफोडी यांचा समावेश आहे.