पणजी : पुढारी वृत्तसेवा
२०२५ या वर्षात राज्यातील अमली पदार्थविरोधी पोलिस, क्राईम ब्रँच तसेच इतर पोलीस ठाण्यांमध्ये एकूण १६३ प्रकरणे नोंदविली. या कारवाईत सुमारे ७८.४८ कोटींचे अमलीपदार्थ जप्त केले. ३२ परदेशी नागरिकांसह २१२ जणांना अटक केली तसेच ३५ प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा झाली आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक सुनिता सावंत यांनी दिली.
गोव्यात अमली पदार्थांच्या विळख्याविरोधात गोवा पोलिस सातत्याने आणि ठामपणे लढा देत आहेत. सक्रिय अंमलबजावणी आणि समन्वयित कारवाईद्वारे अंमली पदार्थांचा प्रसार रोखणे तसेच समाजात कार्यरत असलेली ड्रग्सची जाळी उद्ध्वस्त करण्यासाठी गोवा पोलिसांनी अखंड प्रयत्न केले आहेत.
२०२५ या वर्षाच्या तुलनेत २०२४ मध्ये १६२ प्रकरणे नोंदवून ९ कोटी ९१ लाख १६ हजार ९४७ रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते आणि २४ परदेशी नागरिकांसह १९२ जणांना अटक करण्यात आली होती.
ही सर्व प्रकरणे एनडीपीएस कायद्यांतर्गत दाखल करण्यात आली होती. अधिकाधिक ड्रग्ज माफिया व विक्रेत्यांवर कडक नजर पोलिसांकडून ठेवली जात असल्याने २०२५ मध्ये प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.
अमली पदार्थांचे उच्चाटन करण्यासाठी प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करताना गोवा पोलिसांचे तपास अधिकारी आणि राज्यातील सरकारी वकील यांनी न्यायालयीन खटल्यांचा सातत्याने पाठपुरावा केला.
परिणामी, मागील वर्षांत नोंदविण्यात आलेल्या अनेक प्रकरणांत २०२५ दरम्यान दोष सिद्ध झाले. या वर्षात राज्यातील विविध न्यायालयांनी ३५ प्रकरणांत दोषसिद्ध केले असून एकूण ३७ आरोपी दोषी ठरले आहेत. त्यापैकी ३२ भारतीय नागरिक आणि ५ परदेशी नागरिक आहेत.
हालचालींवर करडी नजर
गोवा पोलिसांनी अमली पदार्थविरोधी लढा अधिक तीव्र करत निगराणी यंत्रणा मजबूत केली असून संशयित व्यक्ती आणि त्यांच्या हालचालींवर कडक लक्ष ठेवले जात आहे. यासोबतच शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी जनजागृती मोहिमा राबवून विद्यार्थी, युवक व नागरिकांना अमली पदार्थांच्या सेवनाचे आणि पुरवठ्याचे दुष्परिणाम समजावून सांगितले जात आहेत. गोवा पोलिसांचा हा समन्वयित प्रयत्न राज्याला अमली पदार्थमुक्त करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण ठरत आहे.