Sinnar News: सिन्नरचा पाणीपुरवठा तीन- चार दिवस बंद राहणार? कारण समोर

Sinnar Municipal Council | सिन्नरचा पाणीपुरवठा तीन-चार दिवस बंद राहण्याची शक्यता
Sinnar Municipal Council
Sinnar Municipal Council Pudhari News Network
Published on
Updated on

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कडवा पाणीयोजनेची शिवडे येथील मुख्य जलवाहिनी स्थलांतरित करण्याचा निर्णय नगर परिषद प्रशासनाने घेतला असून, त्यासाठी पाणीपुरवठा विभागाकडून आवश्यक तयारी सुरू करण्यात आली आहे. शिवडे येथील वादग्रस्त ठिकाणाहून सुमारे ६० मीटर लांबीच्या जलवाहिनीचे जवळच्या रस्त्यालगत स्थलांतर करण्यात येणार आहे. या कामादरम्यान शहराचा पाणीपुरवठा तीन ते चार दिवस बंद राहण्याची शक्यता असून, याबाबतची नेमकी तारीख लवकरच अधिकृतरीत्या जाहीर करण्यात येणार आहे. कामावर सुमारे १७ लाखांचा अंदाजित खर्च अपेक्षित आहे. शहराला पाणीपुरवठा करणारी ही मुख्य जलवाहिनी शिवडे गावातून जात असल्याने गेल्या दोन ते तीन वर्षांपासून शिवडे ग्रामस्थ आणि सिन्नर नगर परिषद यांच्यात वाद सुरू होता. शिवडे ग्रामपंचायतीच्या नूतन कार्यालयासाठी निश्चित करण्यात आलेल्या जागेवर काही प्रमाणात बांधकाम सुरू करण्यात आले होते. मात्र, त्या जागेतून जमिनीखालून कडवा जलवाहिनी जात असल्याने नगर परिषदेकडून आक्षेप घेण्यात आला. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित बांधकामास स्थगिती दिली होती. तेव्हापासून या प्रश्नावरून दोन्ही बाजूंमध्ये वेळोवेळी वादाचे प्रसंग घडत होते. दरम्यान, शिवारातून जाणारी जलवाहिनी वारंवार फुटण्याच्या घटनांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि शेतीजमिनीचे नुकसान होत होते. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. काही वेळा जलवाहिनी दुरुस्तीच्या कामात अडथळेही निर्माण झाल्याचे प्रकार घडले होते.

वादावर पडणार पडदा

आमदार माणिकराव कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख व मुख्याधिकारी अभिजित कदम यांच्या पुढाकाराने हा प्रश्न सामोपचाराने सोडविण्याचा मार्ग स्वीकारण्यात आला. त्यानुसार नगर परिषदेकडून आवश्यक असलेली ६० मीटर लांबीची जलवाहिनी वादग्रस्त जागेवरून हलवून पर्यायी मार्गान रस्त्यालगत स्थलांतरित करण्यात येणार आहे. यामुळे शिवडे ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे तसेच नियोजित अभ्यासिकेच्या कामाचेही मार्ग मोकळे होणार आहेत.

संभाव्य पाणीटंचाईवर नागरिकांना देणार पूर्वसूचना

पाणीपुरवठा विभागाकडून स्थलांतराच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात होताच शहरातील नागरिकांना पूर्वसूचना देण्यात येणार असून, संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेला हा प्रश्न निकाली निघत असल्याने प्रशासनासह ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news