Water Pipeline Leakage  pudhari photo
गोवा

Water Pipeline Leakage | उगवेत वारंवार जलवाहिनी फुटल्याने पाणीटंचाई

Water Pipeline Leakage | हजारो लिटर पाणी वाया; नवीन वाहिनी टाकण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पेडणे : पुढारी वृत्तसेवा

उगवेतील अनेक वर्षांपूर्वी टाकलेली जुनी पाण्याची पाईपलाईन वारंवार फुटत असल्याने हजारो लिटर पाणी वाया जात असून ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यापूर्वी नवीन पाईपलाईन टाकून कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांपूर्वी माऊली मंदिरासमोर पाण्याची पाईपलाईन फुटली होती.

संबंधित विभागाने त्या ठिकाणी दुरुस्ती केली असतानाच शिंदे यांच्या घराजवळ काही अंतरावर पुन्हा पाईपलाईन फुटल्याचे निदर्शनास आले. या सततच्या प्रकारामुळे परिसरातील अनेक घरांमध्ये तीन ते चार दिवस नळ कोरडे पडत असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

पावसाळा तोंडावर आला असताना अशा प्रकारे पाईपलाईन फुटत राहिल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. काही ठिकाणी पावसाळ्यात दुरुस्ती करणे कठीण होणार असल्याने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. ग्रामस्थांच्या मते, केवळ तात्पुरती दुरुस्ती करून हा प्रश्न सुटणार नाही.

संपूर्ण उगवे गावातील जुनी पाईपलाईन बदलून नवीन लाईन टाकल्यासच हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागू शकतो अन्यथा वारंवार पाईपलाईन फुटण्याचे प्रकार सुरू राहून गणेश चतुर्थीच्या काळातही गावात पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सणासुदीच्या काळातही पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ ग्रामस्थांवर येऊ शकते, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

याबाबत पीडब्ल्यूडी अधिकारी, आमदार प्रवीण आर्लेकर तसेच तांबोसे-सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत उगवे-मोप ग्रामपंचायतीचे सरपंच आणि पंच सदस्य यांनी तातडीने लक्ष घालून गावातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा कसा करता येईल, यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी प्रभात क्र. ७ च्या पंच सदस्य समीक्षा महाले, उदय महाले, नारायण महाले, शशिकांत महाले, नामदेव महाले, मनोहर काणेकर, प्रसाद गवंडी आणि इतर ग्रामस्थांनी केली आहे.

निविदेचे काम कुठे रखडले : समीक्षा महाले

पंच सदस्य समीक्षा महाले यांनी सांगितले की, मार्च महिन्यापासून पाण्याची पाईपलाईन वारंवार फुटण्याचे प्रकार वाढले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता नवीन पाईपलाईनसाठी टेंडर प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात येते; मात्र ते टेंडर नेमके कुठे अडकले आहे, हे अद्याप स्पष्ट होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मागील आठवडाभर गावात पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यानंतर दुरुस्ती करण्यात आली; मात्र आता दुसऱ्याच ठिकाणी पाईपलाईन फुटल्याने नागरिकांना पुन्हा पाण्याअभावी त्रास सहन करावा लागत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT