पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्यात वाहन चालवताना किंवा दुचाकीवरून प्रवास करताना मोबाईल फोनचा वापर करण्याच्या वाहतूक उल्लंघनांत यावर्षीच्या सात महिन्यांत ३२ टक्क्यांनी घट झाली आहे. मात्र, याच कालावधीत अतिवेगाने वाहन चालवण्याच्या प्रकरणांत दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी ३ लाख वाहतूक उल्लंघन प्रकरणे अधिक नोंद झाल्याचे गोवा पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे.
जानेवारी ते जुलै २०२६ या कालावधीत मोबाईल फोन वापराच्या १,७४३ प्रकरणांची नोंद झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत ही संख्या २,५६४ होती. त्यामुळे मोबाईल वापराशी संबंधित उल्लंघनात लक्षणीय घट झाली आहे. याउलट, अतिवेगाने वाहन चालवण्याच्या प्रकरणांत मोठी वाढ झाली असून, गेल्या वर्षीच्या १०,४५६ प्रकरणांच्या तुलनेत यंदा २३,६९५ प्रकरणे नोंदवण्यात आली. म्हणजेच अतिवेगाच्या उल्लंघनात १२७ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
हेल्मेट न वापरता दुचाकी चालवण्याच्या प्रकरणांतही वाढ झाली आहे. जानेवारी ते जुलै या कालावधीत यंदा ४३,००७ प्रकरणे नोंदवण्यात आली, तर गेल्या वर्षी ही संख्या २६,११९ होती. म्हणजेच हेल्मेटविना वाहन चालवण्याच्या प्रकरणांत सुमारे ६५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरम्यान, मद्यपान करून वाहन चालवणे किंवा दुचाकी चालवण्याच्या प्रकरणांत घट झाली आहे. यंदा १,८१० प्रकरणे नोंदवण्यात आली असून, गेल्या वर्षी ही संख्या २,८९५ होती.
जानेवारी ते जुलै २०२६ या कालावधीत राज्यात रस्ते अपघातांत १५७ जणांचा मृत्यू झाला. त्यात ९५ मृत व्यक्ती दुचाकीस्वार होत्या. त्यानंतर पादचाऱ्यांचा २३, प्रवाशांचा १७, चालकांचा १०, प्रवाशांतील अन्य प्रकारचे ८, सायकलस्वार २ आणि इतर २ जणांचा समावेश आहे.
जानेवारी ते जुलै २०२६ या कालावधीत गोवा पोलिसांनी एकूण १३,९९,७२४ वाहतूक उल्लंघनाची नोंद केली. गेल्या वर्षी याच कालावधीत १०,९९,११७ उल्लंघने नोंदवण्यात आली होती. त्यामुळे एकूण वाहतूक उल्लंघनांतही वाढ झाल्याचे दिसून येते.