• विरोधी पक्षांच्या आमदारांची परवरी येथे बैठक
• महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी किमान ३० दिवसांचे विधानसभा अधिवेशन घेण्याची विनंती
पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोवा विधानसभेतील विरोधी पक्षांच्या आमदारांची बैठक सोमवारी परवरी येथे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या दालनात झाली. मात्र, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांना या बैठकीची कोणतीही सूचना देण्यात आली नसल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या नेत्यांमध्ये संभाव्य आघाडीच्या मुद्द्यावर आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याने विरोधी पक्षांतील विसंवाद पुन्हा एकदा उघड झाला आहे.
पत्रकारांनी युरी आलेमाव यांना विजय सरदेसाई बैठकीला का उपस्थित नव्हते, असा प्रश्न विचारल्यानंतर युरी यांनी त्यांना मिस्ड कॉल दिला. बैठकीला युरी आलेमाव यांच्यासह आरजीचे आमदार वीरेश बोरकर, आम आदमी पक्षाचे आमदार वेन्झी व्हिएगस व क्रुझ सिल्व्हा तसेच काँग्रेसचे आमदार अॅड. कार्लोस फेरेरा आणि एल्टन डिकॉस्टा उपस्थित होते.
बैठकीबाबत माहिती न मिळाल्याने विजय सरदेसाई यांनी व्हिडिओद्वारे आपली नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, विरोधी आमदारांच्या कोणत्याही बैठकीबाबत मला कोणतीही सूचना मिळाली नाही. या घटनेला राजकीय रंग देण्याचा माझा हेतू नाही, मात्र हा प्रकार खोडसाळपणाचा आणि पूर्णपणे अयोग्य आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
सरदेसाई म्हणाले की, बैठक सुरू झाल्यानंतर एका पत्रकाराने आपण बैठकीला का उपस्थित नाही, असा प्रश्न विचारल्यानंतरच विरोधी आमदारांची बैठक सुरू असल्याचे समजले. पत्रकारांशी बोलत असतानाच युरी आलेमाव यांचा मिस्ड कॉल आला. नेमके असे का झाले, हे मला माहिती नाही, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, एकूणच आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्यामुळे राज्यात विरोधी पक्षांतील विसंवाद पुन्हा एकदा उघड झाला.
राजकीय वर्तुळात अशीही चर्चा सुरू आहे की, विजय सरदेसाई काँग्रेसमध्ये दाखल झाले आणि आगामी निवडणुकांनंतर काँग्रेस सत्तेच्या जवळ पोहोचली, तर ज्येष्ठ आमदार म्हणून नेतृत्वाची संधी त्यांच्याकडे जाऊ शकते. त्यामुळे युरी आलेमाव सरदेसाई यांच्या काँग्रेस प्रवेशाला विरोध करत असल्याची चर्चा राजकीय स्तरावर रंगली आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका समोर आलेली नाही.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी विरोधी पक्षांच्या बैठकीला गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांना बोलावले नसल्याच्या चर्चा सरदेसाई यांच्या पोस्टमुळे सुरू होत्या. मात्र, आलेमाव यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सरदेसाई यांना बैठकीला बोलावल्याचा एक व्हॉट्सॲप संदेश पत्रकारांना दाखवला.
त्यात आलेमाव यांनी विरोधी आमदारांच्या बैठकीला उपस्थित राहण्याची विनंती सरदेसाई यांना केली होती, असे सांगितले. आलेमाव म्हणाले की, सरकार विरोधी पक्षाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत आहे, तसेच सर्व विरोधी आमदार एकाच रणनीतीसह एकवटले असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. महत्त्वाच्या सार्वजनिक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी किमान ३० दिवसांचे विधानसभा अधिवेशन घेण्याची विनंती अध्यक्षांना केली जाईल, असेही आलेमाव म्हणाले.
दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आपले गोवा प्रभारी काँग्रेस आमदारांच्या मतदारसंघात जाऊन प्रचार करत असल्याचा आरोप केल्यानंतर आम आदमी पक्षाने त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले.
आपले गोवा कार्याध्यक्ष जर्सन गोम्स म्हणाले की, काँग्रेसलाच विरोधी आघाडी नको असल्याचे त्यांच्या भूमिकेतून दिसून येते. गोम्स म्हणाले की, विरोधकांची एकजूट खिळखिळी करण्यासाठी काँग्रेस निमित्त शोधत आहे. वेळोळी आणि बाणावली मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या हालचालींबाबत आपण कधीही सार्वजनिक आक्षेप घेतला नाही. मात्र, गोव्यातील विरोधी पक्षांची एकजूट कमकुवत करण्याचे काम काँग्रेसकडून होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.