'बिर्च बाय रोमिओ लेन' नाईटक्लबला लागलेल्या भीषण आग प्रकरणी नाईटक्लबचे सह-मालक सौरभ लुथरा, गौरव लुथरा आणि अजय गुप्ता यांचा जामीन रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. Pudhari
गोवा

Goa Nightclub Fire : नाईटक्लब आग प्रकरण : मालकांचा जामीन रद्द करण्याचा हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम

आरोपींना आत्मसमर्पणासाठी दोन आठवड्यांचा कालावधी

पुढारी वृत्तसेवा

Goa nightclub fire Supreme Court : उत्तर गोव्यातील आर्पोरा येथील 'बिर्च बाय रोमिओ लेन' (Birch by Romeo Lane) या नाईटक्लबला लागलेल्या भीषण आगीत २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. याप्रकरणी नाईटक्लबचे सह-मालक सौरभ लुथरा, गौरव लुथरा आणि अजय गुप्ता यांचा जामीन रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज (३१ ऑगस्ट) स्पष्ट नकार दिला.

मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला होता जामीन

सत्र न्यायालयाने आपल्या विशेष अधिकारांचा योग्य वापर केला नाही, असे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या एकल पीठाने १८ ऑगस्ट रोजी तिन्ही आरोपींचा जामीन रद्द केला होता आणि त्यांना २ आठवड्यांच्या आत आत्मसमर्पण (सरेंडर) करण्याचे निर्देश दिले होते.

आयपीसी कलम ३०४ (भाग २) लागू होत नाही : आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद

लुथरा बंधूंची बाजू मांडताना वरिष्ठ वकील सिद्धार्थ दवे यांनी न्यायालयात सांगितले की, "आरोपींच्या कोणत्याही कृत्यामुळे हा मृत्यू झालेला नाही. भारतीय दंड संहितेचे (IPC) कलम ३०४ (भाग २) या प्रकरणाला लागूच होऊ शकत नाही. जर फिर्यादी पक्षाला खटला चालवायचा असेल, तर तो जास्तीत जास्त कलम ३०४-अ (निष्काळजीपणामुळे मृत्यू) खालीच येऊ शकतो." भारतीय न्याय संहिता, २०२४ (BNS) अंतर्गत निष्काळजीपणाने झालेल्या मृत्यूच्या शिक्षेत ५ वर्षांपर्यंत वाढ करण्यात आली असल्याचेही त्यांनी नमूद केले.याशिवाय, सत्र न्यायालयाने आरोपींना तपास अधिकाऱ्यांसमोर नियमित हजेरी लावणे किंवा भारतात प्रवासासाठी न्यायालयाची परवानगी घेणे अशा अटी घातल्या नव्हत्या, या कारणावरून उच्च न्यायालयाने जामीन रद्द केला होता. या अटी सर्वोच्च न्यायालय आताही लागू करू शकते, असा युक्तिवाद दवे यांनी केला.

सर्वोच्च न्यायालयाने ठेवला उच्च न्यायालयाचा निर्णय कायम

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती शील नागू यांच्या खंडपीठासमोर लुथरा बंधूंतर्फे वरिष्ठ वकील सिद्धार्थ दवे आणि अजय गुप्ता यांच्यातर्फे वरिष्ठ वकील श्याम दिवाण यांचा युक्तिवाद झाला. आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावत याचिका फेटाळली. न्यायमूर्ती दत्ता यांनी "याचिका फेटाळण्यात येत आहे" (Dismissed) असा संक्षिप्त निर्णय दिला.

आत्मसमर्पणासाठी दोन आठवड्यांचा कालावधी

या निर्णयानंतर वकील श्याम दिवाण यांनी आरोपींना आत्मसमर्पणासाठी दोन आठवड्यांचा वेळ देण्याची विनंती केली. न्यायालयाने आजपासून दोन आठवड्यांचा कालावधी मंजूर केला असून, या प्रकरणातील आरोप निश्चितीची (Framing of charges) प्रक्रिया आणि खटला जलद गतीने चालवण्याचे निर्देश दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT