म्हापसा : पुढारी वृत्तसेवा
हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत पाच पर्यटकांसह २५ जणांच्या मृत्यूस जबाबदार धरून गोव्यातून थायलंडला पळून गेलेल्या गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा या संशयितांना पोलिसांनी बुधवारी १७ रोजी गोव्यात आणले. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर हजर केले असता त्यांनी आरोग्याची समस्या असल्याचे न्यायालयाला सांगितले.
त्यामुळे न्यायालयाने त्यांची पुन्हा आरोग्य तपासणी करण्याचे आदेश पोलिसांना दिले. आरोग्य तपासणी करून त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
६ डिसेंबर रोजी या नाईट क्लबमध्ये अग्निकांड झाल्यानंतर या क्लबचे मालक गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा हे दोघेही थायलंडला पळून गेले होते. गोवा पोलिसांच्या मागणीनंतर भारत सरकारने त्यांचे पासपोर्ट रद्द केल्यामुळे थायलंडमध्ये त्यांना १० रोजी अटक करण्यात आली होती. मंगळवारी १६ रोजी त्यांना दिल्लीला आणण्यात आले. तेथून बुधवारी १७ रोजी सकाळी कडक बंदोबस्तात त्यांना गोव्यात आणण्यात आले.
दोन्ही संशयितांना दिल्लीतून आणण्यासाठी गेलेले पोलिस पथक मोप मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी १०.४० वाजता दाखल झाले. यावेळी विमानतळावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यानंतर त्यांना आरोग्य तपासणीसाठी विमानतळावरून थेट शिवोली आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे संशयितांनी छातीत दुखत असल्याचे सांगितल्यामुळे त्यांना पुढील तपासणीसाठी म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.
२५ जणांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या संशयित लुथरा बंधूंना गोव्यात आणण्यासाठी डिचोलीचे उपअधीक्षक श्रीदेवी बी. व्ही. यांच्या नेतृत्वाखाली पर्वरीचे निरीक्षक राहुल परब, उपनिरीक्षक मंदार परव, हणजूणचे निरीक्षक सूरज गावस, उपनिरीक्षक साहिल वारंग, हवालदार सुशांत चोपडेकर, कॉन्स्टेबल ससेंद्र नास्नोडकर, प्रकाश पोळेकर व अभिषेक कासार यांचे गोवा पोलिसांचे पथक गेले होते.
म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयातून त्यांना दुपारी २ वाजता हणजूण पोलिस स्थानकात आणण्यात आले. यावेळी पोलिस स्थानकात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संशयितांना पोलिस स्थानकात घेऊन येताना रस्ता पूर्णपणे अडवण्यात आला होता.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यात आलेल्या या लुथरा बंधूंना दुपारी ३.३० वाजता म्हापसा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालय परिसरातही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
न्यायालयात हजर केल्यानंतर सौरभ लुथरा याने टेलबोन फ्रॅक्चर असल्याचे, तर गौरव लुथरा याने डावा पाय सुन्न असल्याचे सांगितले.
त्यामुळे न्यायालयाने दोघांचीही पुन्हा आरोग्य तपासणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार त्यांना पुन्हा म्हापसा जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.
आरोग्य तपासणी केल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिसांनी दहा दिवसांची कोठडी मागितली होती.
सौरभ आणि गौरव लुथरा यांना हणजूण पोलिस स्थानकाच्या कोठडीत आणल्यानंतर त्यांची चौकशी करण्यासाठी सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. रात्री उशिरापर्यंत पोलिस स्थानकाभोवती पोलिसांचा गराडा कायम होता.