दाबोळी/पणजी : वास्को येथे एका कार्यक्रमात गौतम खट्टर या परराज्यातील वक्त्याने भाषण देताना गोव्यातील धार्मिक सलोखा बिघडवणारे केलेले विधान अयोग्य आहे. गोव्यातील धार्मिक सलोखा कुणीही बिघडवू नये. सदर व्यक्तीवर एफआरआय दाखल झाला असून योग्य ती कारवाई केली जाईल, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, या वक्त्याच्या वादग्रस्त विधानांमुळे अल्पसंख्याक दुखावले आहेत. बाहेरील व्यक्तीला ज्यावेळी धार्मिक किंवा इतर कार्यक्रमाला वक्ता म्हणून बोलावले जाते, त्यावेळी गोव्यातील धार्मिक एकोपा आणि येथील स्थितीची माहिती आयोजकांनी त्याला द्यायला हवी.
एखादी व्यक्ती माहिती देऊनही अचानक बोलते, त्यावेळी आयोजकांचाही नाईलाज होतो. मात्र, वास्को येथे वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो उपस्थित होते, त्यांनी वक्त्याला अडवायला हवे होते; पण आयोजकांनी त्याला अडवले, त्यामुळे तो जास्त बोलू शकला नाही, तरी जे वक्तव्य केले गेले, त्यामुळे धार्मिक सलोखा बिघडण्याचा धोका निर्माण झाला होता. तक्रार दाखल झाल्याने चौकशी होईल व योग्य ती कारवाई होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
खट्टर विरोधात गुन्हा नोंद
ख्रिस्ती बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते आणि कुठ्ठाळीचे काँग्रेस नेते पीटर डिसोझा यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी १९ एप्रिल रोजी रात्री ११.१८ वा. एफआयआर नोंदवला. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम २९९ आणि १९६ अंतर्गत अजामीनपात्र गुन्हा नोंदवला आहे.
वक्तव्याबाबत आयोजकांकडून माफीनामा
दुसरीकडे, आयोजकांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल वापरलेले शब्द दुर्दैवी असून, वक्त्याने असे बोलणे सुरू करताच त्याला थांबवण्यात आले होते, असा दावा करत ज्यांच्या भावना दुखावल्या आहेत, त्यांची आयोजकांनी माफी मागितली आहे.
गुदिन्हो यांच्या विरोधात एफआयआर दाखल करा : युरी
पणजी: गौतम खट्टर याला तत्काळ अटक करावी आणि खट्टर यांच्या वक्तव्याचे पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी समर्थन केल्याचा दावा करत त्यांच्यावरही एफआयआर दाखल करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीने केली. आलेमाव यांनी इतर पदाधिकाऱ्यांसह पोलिस महासंचालक आलोक कुमार यांची भेट घेतली. यावेळी खासदार विरिएतो फर्नांडिस, आमदार एल्टन डिकॉस्टा, काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील कवठणकर आणि तुलिओ डिसोझा, काँग्रेस नेते समील वळवईकर, डॉ. केतन भाटीकर, अमित पालेकर, उत्तर जिल्हाध्यक्ष शशांक नार्वेकर, दक्षिण जिल्हाध्यक्ष असिज नोरोन्हा आदी उपस्थित होते.