पणजी : पुढारी वृत्तसेवा
मावळत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी गोव्यात लाखो पर्यटक दाखल झाले. राज्यातील सर्वच किनाऱ्यांवर रात्री उशिरापर्यंत पार्टी व नृत्याच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
रात्री १२ वाजता फटाक्यांची आतषबाजी करीत नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. गोवा हे जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ असल्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही वर्षाच्या शेवटच्या दिवशी ३१ डिसेंबर रोजी सरत्या वर्षाच्या सूर्याला निरोप देण्यासाठी पर्यटकांनी किनारी भागात गर्दी केली होती.
सर्व समुद्र किनारे हाऊस फुल्ल झाले होते. रात्री उशिरापर्यंत पर्यटक किनाऱ्यावर होते. काही भागात अनेक पर्यटकांनी संपुर्ण रात्र किनाऱ्यावर काढली. नवीन वर्षाच्या स्वागातासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेरण्यात आली. पोलिसांव्यतिरिक्त, दहशतवाद विरोधी पथक (एटीएस), बॉम्ब पथक आणि श्वान पथक यासारख्या विशेष युनिट्समंधील सुमारे ७०० पोलिस कर्मचारी जादा तैनात करण्यात आले होते.
दोन्ही जिल्ह्यांमधील स्थानिक पोलिसांकडून किनारी भागासोबतच अंतर्गत भागातही कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सज्ज राहीले. याव्यतिरिक्त, पर्यटक पोलिस आणि किनारी सुरक्षा पोलिस तैनात करण्यात आले. एटीएस पथके चोवीस तास गस्तीला होती. बॉम्ब निकामी करणारे पथक आणि श्वान पथक देखील तैनात करण्यात आले होते. दृष्टी मरीनमध्ये पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात जीवरक्ष तैणात केले होते.
नाईट क्लब सुरूच...
महिनाभरापूर्वी हडफडे येथील नाईट क्लबला आग लागून २५ जणांचे बळी गेले होते. असे असले तरी नववर्षानिमित्त किनारी भागातील अनेक नाईट क्लबचे ऑनलाईन बुकिंग सुरू होते. गोव्यात आलेल्या पर्यटकांनी या क्लबमध्ये नववर्षाचा आनंद साजरा केला.