वाईच्या पश्चिम भागात भात लावणीला प्रारंभ झाला असून शेत शिवारात बळीराजाची लगबग सुरू आहे. Pudhari Photo
गोवा

Goa Paddy Cultivation Rain | पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित; काही भागात भात लावणी सुरू

Goa Paddy Cultivation Rain | लहरी पावसामुळे भात लावणीला विलंब, तरीही शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित; पीक उशिरा तयार होण्याची भीती

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

लहरी पावसाने राज्यातील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले होते. पावसाच्या दडीमुळे पेरणी आणि लावणीला विलंब झाला असला, तरी आता पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने रखडलेल्या लावणीला गोव्याच्या काही भागात सुरुवात झाली आहे. कृषी संचालक चंद्रहास देसाई म्हणाले की, पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे भात पिकाचे नुकसान झालेले नाही.

मात्र, तरवा काढून लावणी करण्यास सुमारे दहा दिवसांचा विलंब झाला आहे. आता पावसाला पुन्हा सुरुवात झाल्याने लावणीचे काम वेगाने सुरू करता येईल. पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. कृषी खात्याने मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. ज्यांनी तरवा काढून ठेवला होता, त्यांना ती सुकण्याची भीती होती.

ज्यांनी तरवा अद्याप काढला नव्हता, त्यांनाही तो खराब होण्याची चिंता होती. आता पाऊस सुरू झाल्याने पुरेसे पाणी मिळणार असून तरवा तग धरेल. तसेच ज्यांनी तरवा काढून ठेवला आहे, त्यांनाही आता लावणी करता येणार आहे, असे कृषी संचालक देसाई म्हणाले.

केपे, काणकोण आणि सांगे तालुक्यांतील बहुतांश शेती डोंगराळ भागात आहे. या भागात पाऊस न पडल्यास शेतीचे नुकसान होण्याची शक्यता असते. मात्र, गेल्या दोन दिवसांत या भागांत जोरदार पाऊस झाल्याने चिंतेचे कारण राहिलेले नाही.

हवामान खात्याने शनिवारपासून पाऊस पुन्हा सक्रिय होईल, असा अंदाज वर्तविला होता. मात्र गुरुवारपासूनच पावसाला सुरुवात झाली. मात्र, पेरणी आणि लावणीला झालेल्या विलंबाचा परिणाम पुढील शेतीकामांवर होणार असून त्यामुळे भात पीकही उशिरा तयार होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT