पणजी : गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (गोमेकॉ) मध्ये पावसाळ्याशी संबंधित आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून, डॉक्टरांकडे दररोज ६० ते ८० तापग्रस्त रुग्ण येत आहेत, ज्यांना डेंग्यू आणि मलेरियासारख्या संसर्गाची शक्यता नाकारण्यासाठी रक्त तपासणीची आवश्यकता असते, असे गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील पॅथॉलॉजी विभागाचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख डॉ. आर. जी. वाईजमन पिंटो यांनी सांगितले.
डॉ. पिंटो म्हणाले की, पावसाळ्यात विषाणूजन्य ताप, श्वसनसंस्थेचे संक्रमण, अतिसार, अन्न विषबाधा आणि डेंग्यू हे सामान्य आजार असतात. जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या महिन्यांत जास्त आर्द्रता, तापमानातील चढउतार आणि कमी सूर्यप्रकाशामुळे आजारपण वाढते. एकेकाळी गोव्यातील पावसायातील प्रमुख आजारांपैकी एक असलेला मलेरिया, सरकारी नियंत्रण उपाययोजनांमुळे गेल्या काही वर्षांत कमी झाला आहे. परंतु तरीही काही पॉझिटिव्ह रुग्ण आढळतात. हे रुग्ण प्रामुख्याने स्थलांतरित मजुरांमध्ये आढळतात, असे डॉ. पिंटो म्हणाले.
हवेतून पसरणाऱ्या संसर्गमध्ये विषाणूजन्य ताप, इन्फ्लूएन्झा आणि सर्दी यांचा समावेश होतो, तर अन्न आणि पिण्याचे पाणी दूषित झाल्यावर पाण्यामुळे होणारे आजार अधिक सामान्य होतात. डासांमुळे होणारे आजार ही एक मोठी चिंतेची बाब आहे. गोमेकॉने यावर्षी जानेवारी ते मे दरम्यान डेंग्यूच्या आठ रुग्णांची नोंद केली. केवळ जून महिन्यातच २१ प्रकरणे नोंद झाल्याचे डॉ. पिंटो यांनी सांगितले.
दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातील सल्लागार डॉक्टर आणि माजी वरिष्ठ फिजिशियन, डॉ. एडवर्ड डिमेलो म्हणाले की, दोन ते तीन दिवसापेक्षा जास्त काळ टिकणाऱ्या तापाकडे लोकांनी दुर्लक्ष करू नये. जर रुग्णाला सतत उलट्या होणे, निर्जलीकरण, रक्तस्राव, गोंधळ, मान ताठ होणे, कावीळ होणे किंवा खूप कमी लघवी होणे अशी लक्षणे दिल्यास तत्काळ वैद्यकीय मदत घ्यावी, कारण ही गंभीर आजाराची लक्षणे असू शकतात, असे सांगितले.
डॉ. एडवर्ड डिमेलो म्हणाले की, पावसाळ्यात रुग्णालयांमध्ये सामान्यतः: व्हायरल ताप, खोकला आणि सर्दी, श्वसनमार्गाचे संक्रमण, अतिसार, अन्न विषबाधा, डेंग्यू आणि लेप्टोस्पायरोसिस यांसारख्या हंगामी आजारांमध्ये वाढ दिसून येते. 'मुसळधार पावसानंतर येणारा काळ उच्च आर्द्रता, पाणी साचणे आणि अन्नाची अस्वच्छता यामुळे अशा आजारांच्या प्रसारासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते. लोकांनी वैयक्तिक स्वच्छता राखावी, सुरक्षित पाणी प्यावे, ताजे शिजवलेले अन्न खावे, साचलेले पाणी टाळावे, डासांपासून संरक्षण वापरावे आणि लक्षणे कायम राहिल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी, असे ते म्हणाले.