CM Pramod Sawant 
गोवा

CM Pramod Sawant | गोव्याचे भाग्यविधाते भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्यभरात भावपूर्ण अभिवादन!

CM Pramod Sawant | भाऊंचे दूरदर्शी नेतृत्व प्रेरणादायी : मुख्यमंत्री

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी गोव्याच्या विकासाचा पाया रचला, त्यांचे दूरदर्शी नेतृत्व व समर्पित सेवा पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

गोव्याचे भाग्यविधाते व पहिले मुख्यमंत्री दयानंद उर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त बुधवारी राज्यभरात त्यांना अभिवादन करण्यात आले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पणजीतील जुन्या सचिवालयाजवळील भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना भावपूर्ण अभिवादन केले.

यावेळी वीजमंत्री व मगोपचे नेते सुदिन ढवळीकर, मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू, सरकारी अधिकारी निखिल देसाई व विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. सावंत म्हणाले की, भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त, त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचे आणि गोव्याच्या विकास व सार्वजनिक जीवनातील चिरस्थायी योगदानाचे स्मरण करून आपण त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहात आहे. त्यांची समर्पित सेवा आणि गोव्याच्या जनतेप्रति असलेली वचनबद्धता पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहणार आहे.

विद्यार्थ्यांपर्यंत भाऊंचे चरित्र पोहोचावे यासाठी सरकारने खास उपक्रम सुरू केले आहेत. मुख्यमंत्र्यांनी पर्वरी येथील विधानसभेच्या समोर असलेल्या भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून श्रद्धांजली वाहिली.पणजीतील जुन्या सचिवालयाजवळील गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुतळ्याला त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त वंदन करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत.

भाऊसाहेबांच्या विचारांतून विकासाची दिशा : ढवळीकर

भाऊसाहेब बांदोडकर यांनी राज्याच्या विकासासाठी केलेले कार्य अतुलनीय आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे गोव्याच्या विकासाला योग्य दिशा मिळाली. भाऊसाहेबांनी सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून प्रशासनाची वाटचाल केली. शिक्षण, सामाजिक विकास आणि लोककल्याणाच्या क्षेत्रात त्यांनी घेतलेले निर्णय गोव्याच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे ठरले. त्यांचे विचार आणि लोकसेवेची भूमिका आजही प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले.

समाधी वर्षभरात पूर्ण होणार

भाऊसाहेब बांदोडकर यांच्या समाधीचे नूतनीकरण सुरू आहे. येत्या वर्षभरात हे काम पूर्ण होईल. त्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी या विषयावर पत्रकारांनी विचारले असता दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT