मडगाव : मडगावात एका दिवसात दोन संशयास्पद मृत्यूंच्या घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. रेल्वे स्टेशन रोडवर अज्ञात व्यक्ती मृतावस्थेत आढळून आली, तर दुसऱ्या प्रकरणात पश्चिम बंगालहून कामासाठी आलेल्या मजुराचा अचानक मृत्यू झाला आहे. दोन्ही प्रकरणांचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
पहिल्या घटनेत १ मे रोजी रात्री सुमारे ४० वर्षीय अज्ञात पुरुष रेल्वे स्टेशन रोड, मडगाव येथे मृत अवस्थेत आढळला. त्याला दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात नेण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. प्राथमिक चौकशीत संबंधित व्यक्ती भिकारी असून गेल्या काही महिन्यांपासून त्या परिसरात वास्तव्यास असल्याचे समोर आले आहे. मृतदेह पुढील वैद्यकीय व कायदेशीर प्रक्रियेसाठी रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलिस सुभाष गायकवाड करत आहेत. दुसऱ्या घटनेत आनंदा बिस्वास (वय ४०, रा. पश्चिम बंगाल) यांना मृत अवस्थेत मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात आणण्यात आले. ते बाणावली येथील बीचवरील सी-फूड शॅकमध्ये कामासाठी केवळ दोन दिवसांपूर्वी आले होते. तेथेच ते बेशुद्ध अवस्थेत आढळल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणाचा तपास कोलवा पोलीस निरीक्षक अनिल कृष्णा करत आहेत.