गोवा

Goa Marathi Film Festival | 'बंडखोर 'ने उघडणार गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचा पडदा

Goa Marathi Film Festival | पणजीत ७ ते ९ ऑगस्ट दरम्यान आयोजन; संजय दत्तसह विविध कलाकारांची उपस्थिती

पुढारी वृत्तसेवा

पणजी : मागील पंधरा वर्षांपासून विन्सन वर्ल्डतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या दर्जेदार मराठी चित्रपटांचा गौरव करणाऱ्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाची १५ वी आवृत्ती ७ ते ९ ऑगस्टदरम्यान प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार असून, महेश मांजरेकर दिग्दर्शित 'बंडखोर' या चित्रपटाने महोत्सवाचा पडदा उघडणार आहे.

पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सचिन चाटे, संजय शेट्ये, श्रीपाद शेट्ये आणि सिद्धेश म्हांबरे यांनी सविस्तर माहिती दिली. महेश मांजरेकर स्वतः कलाकार आणि तांत्रिक चमूसह चित्रपटाचे सादरीकरण करणार आहेत. प्रियदर्शिनी इंदलकर, छाया कदम तसेच गोव्यातील अनेक कलाकारांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाची निर्मिती संजय शेट्ये यांनी केली असून, या चित्रपटाचा जागतिक प्रीमियर महोत्सवात होणार आहे.

गोव्यात चित्रित करण्यात आलेल्या या चित्रपटात स्थानिक कलाकार व तंत्रज्ञांचा मोठा सहभाग असून, महिलांच्या सक्षमीकरणाचा विषय यात मांडण्यात आला आहे. महोत्सवाच्या १५ व्या आवृत्तीत साधारण २० हून अधिक चित्रपट असून नवोदित चित्रपटनिर्माते, नामवंत कलाकार आणि गोव्यासह विविध भागांतील चित्रपटप्रेमी एकत्र येणार आहेत. यात विशेष प्रीमियरही रसिकांना पाहायला मिळणार आहेत.

यंदाच्या महोत्सवात अनेक महत्त्वाचे प्रीमियर आणि स्क्रिनिंग होणार आहेत. 'सावरबोंड', 'क्रांतिज्योती विद्यालय', 'उत्तर', 'फस्क्लास दाभाडे', 'तिघीं', 'तो ती आणि फुजी', 'तुंबाडची मंजुळा', 'मर्दिनी', 'भूतम भयम्', 'अगं अगं सुनबाई काय म्हणता सासुबाई आणि 'घबाडकुंड' हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्याचप्रमाणे 'पिशवी आणि 'स्नोफ्लॉवर' या चित्रपटांचे प्रीमियर शो देखील यावेळी होणार आहेत.

या' कलाकारांची विशेष उपस्थिती

दरवर्षीप्रमाणे यंदाही दिग्दर्शक, अभिनेते, लेखक, तंत्रज्ञ आणि चित्रपटसृष्टीतील मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. यावर्षी सचिन खेडेकर, रेणुका शहाणे, मृणाल कुलकर्णी, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, स्वप्नील जोशी, अनिता दाते, जितेंद्र जोशी, ललित प्रभाकर, निर्मिती सावंत, सुबोध भावे, सिद्धार्थ बोडके, प्रार्थना बेहरे, नेहा पेंडसे, सोनाली कुलकर्णी आणि मृन्मयी गोडबोले यांच्यासह यांसह संजय दत्त यांची उपस्थितीही आकर्षण ठरणार आहे.

मोहन जोशी यांना 'कृतज्ञता पुरस्कार'

भारतीय रंगभूमी, मराठी चित्रपट तसेच हिंदी चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना यंदाचा 'कृतज्ञता पुरस्कार' प्रदान करण्यात येणार आहे. पाच दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या असून, त्यांच्या प्रभावी अभिनयामुळे आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्वामुळे त्यांनी प्रेक्षकांचा आणि चित्रपटसृष्टीचा मोठा सन्मान मिळविला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT