पणजी : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १९, २० आणि २२ डिसेंबर रोजी राज्यातील सर्व परवानाधारक दारूविक्री आस्थापने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश नगरपालिका हद्द आणि पणजी महापालिका क्षेत्र वगळता इतर सर्व पंचायत क्षेत्रांमध्ये लागू राहणार आहेत.
मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेच्या दिवशी कायदा व सुव्यवस्थेची स्थिती सुरळीत राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि, बार अँड रेस्टॉरंट परवाना असलेल्या आस्थापनांना फक्त खाद्यपदार्थ विक्री करण्यासाठी रेस्टॉरंटचा भाग सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.
मात्र, बार काउंटर पूर्णपणे बंद ठेवावा लागणार असून दारू विक्री करण्यास सक्त मनाई असेल. अशा आस्थापनांनी दारू विक्री केली जाणार नाही, फक्त रेस्टॉरंट खाद्यपदार्थांसाठी खुले आहे असा फलक लावणे बंधनकारक असेल. राज्यातील परवानाधारकांनी आदेशांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.