पणजी : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभापतींच्या अवमानाचा मुद्दा कळीचा ठरला. या विषयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. सत्ताधार्यांनी सभापतींचा अवमान करणार्या आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी माफी मागावी, अशी मागणी केली असताना त्याला एल्टन यांच्यासह विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी हरकत घेत कोणतीही कारवाई करा, माफी मागणार नाही, असे सांगत सत्ताधार्यांना चोख प्रत्युत्तर दिले. या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज दोनदा तहकूब करावे लागल्याने प्रश्नोत्तराचा तास त्यातच निघून गेला.
आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी काही दिवसांपूर्वी सभापती रमेश तवडकर यांच्यावर केलेल्या टीकेचा मुद्दा उपस्थित करून आमदार दाजी साळकर यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव मांडत आमदार डिकॉस्टा यांनी सभापतींची माफी मागावी, अशी मागणी केली. यावेळी सत्ताधारी आमदारांनी हातात ‘एल्टन माफी मागा,’ असे लिहिलेले फलक दाखवत या मागणीचे समर्थन केले. आमदार एल्टन व विरोेधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी माफी मागण्यास नकार दिल्याने गदारोळाला सुरुवात झाली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही साळकर यांच्या मागणीला समर्थन देत सभापतींचा अवमान करणार्या आमदाराने माफी मागायला हवी, अशी मागणी केली. मात्र, विरोधकांनी सडेतोड उत्तर देत काय ती कारवाई करा, माफी मागणार नसल्याचे ठणकावून सांगितल्याने हा गदारोळ अधिकच वाढला. त्यामुळे त्यामुळे सभापतींनी पहिल्यांदा अर्धा तास व पुन्हा तसाच प्रकार घडल्याने पंधरा मिनिटे सभागृहाचे कामकाज तहकूब केले. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आमदारांना सभापती संदर्भात काही बोलायचे असेल, तर ते सभागृहात बोलणे गरजेचे होते. त्यांनी बाहेर नको ते विषय काढून सभापतींचा अवमान करणे चुकीचे असल्याचे स्पष्ट केले.
सभापती रमेश तवडकर म्हणाले, आपण 1996 पासून आदिवासींच्या हक्कांसाठी आंदोलनामध्ये आहे. सभागृहामध्ये आमदार गणेश गावकर यांनी ‘एसटी’ समाजाला आरक्षण देण्याचा ठराव मांडला होता. हा ठराव सत्ताधारी पक्षानेही मान्य केलेला आहे. लक्षवेधी सूचना आली, त्यावेळी त्यावर दीर्घ चर्चाही झालेली आहे. या प्रश्नी एक शिष्टमंडळ दिल्लीला गेले होते. या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली आहे. त्यानंतर केंद्रीय मंत्री शहा यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एसटी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यामुळे एसटी समाजाला आरक्षण निश्चितपणे मिळणार असल्याचे सभापती तवडकर यांनी सांगितले.