फोंडा : कुर्टी - खांडेपार महामार्गावर केरये येथे मोटारसायकल आणि कंटेनर ट्रक यांच्यातील भीषण धडकेत मोटारसायकल चालकाचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवरील दुसरा स्वार गंभीर जखमी झाला. मयताचे नाव उद्धव बाळासाहेब कोळी (वय २५) असे असून जखमी स्वाराचे नाव अभिषेक भीमराव धावरे (२५) असे आहे.
(जि. दोघेही पंढरपूर सोलापूर, महाराष्ट्र) येथील आहेत. हा अपघात शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास घडला. राजस्थानहून गोव्यात फोंडा येथे माल घेऊन आलेला आरजे ०६ जीसी ९९८९ या क्रमांकाचा मालवाहू कंटेनर ट्रक अचानक नादुरुस्त झाल्याने केरये येथे महामार्गावर रस्त्याच्या कडेला थांबवण्यात आला. दुरुस्ती काम सुरू करण्यात आले. मात्र, रस्त्यावर थांबवण्यात आलेल्या ट्रकचालकाने कोणतीही खबरदारी घेतली नाही.
दरम्यान, महाराष्ट्रातून फोंड्याला भरधाव येणारी एमएच १३ एफबी ५०१९ कमांकाच्या बुलेट मोटारसायकलने मागून कंटेनर ट्रकला जोरदार धडक दिली. त्यात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवरील अन्य एकजण गंभीर जखमी झाला. त्याला इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. फोंडा पोलिस अधिक तपास करीत आहेत.