केरी : पुढारी वृत्तसेवा
गोवा-कर्नाटक सीमेलगत चोर्ला घाटातील सुर्ल-सत्तरी येथे कर्नाटक अबकारी खात्याच्या तपासणी नाक्यावर वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. गोव्यातून कर्नाटकात जाणाऱ्या वाहनांची येथे नियमित तपासणी केली जाते; मात्र ही तपासणी अनेकदा रस्त्याच्या मधोमध वाहने अडवून केली जात असल्याने वाहतुकीवर परिणाम होत असून इतर वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.
विशेष म्हणजे, तपासणी सुरू असताना काहीवेळा रुग्णवाहिका अथवा इतर आपत्कालीन सेवांच्या वाहनांनाही तत्काळ मार्ग उपलब्ध होत नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत गंभीर अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचीही अबकारी कर्मचारी बसमध्ये चढून तपासणी करतात.
प्रवाशांच्या बॅगा तपासल्या जातात. गोव्यातील कमी दरातील मद्य कर्नाटकात नेण्याचा प्रयत्न अनेकजण करत असल्याने ही तपासणी केली जात असल्याचे सांगितले जाते. मात्र, काही प्रवाशांनी गंभीर आरोप करताना सांगितले की, मद्याच्या बाटल्या आढळल्यास त्या जप्त न करता प्रत्येक बाटलीमागे ठराविक रक्कम घेऊन संबंधितांना सोडून दिले जाते.
बसमधील काही वाहकांकडूनही प्रत्येक बाटलीमागे १०० रुपये द्या आणि पुढे जा, असा सल्ला प्रवाशांना दिला जात असल्याचे बोलले जात आहे. गोव्यात मद्य स्वस्त मिळत असल्याने अनेकजण ते कर्नाटकात घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे काही प्रवासी पैसे देऊन कारवाई टाळण्याचा मार्ग स्वीकारतात, अशी माहिती समोर येत आहे.
प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात
या सर्व प्रकारांची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तसेच भरारी पथकाने अचानक भेट देऊन तपासणी प्रक्रियेची चौकशी करावी, अशी मागणी वाहनचालक व स्थानिक नागरिकांकडून होत आहे. तपासणीच्या नावाखाली सर्वसामान्यांना त्रास होणार नाही, वाहतूक सुरळीत राहील आणि कोणत्याही प्रकारची अवैध वसुली थांबेल, यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
संवादावेळी अडचणी
तपासणी नाक्यावर काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना हिंदी भाषेचे पुरेसे ज्ञान नसल्याने गोवा, महाराष्ट्र व इतर राज्यांतील वाहनचालकांशी संवाद साधताना अडचणी निर्माण होत आहेत. बहुतांश कर्मचारी केवळ कन्नड भाषेत संवाद साधत असल्याने प्रवासी व अधिकारी यांच्यात गैरसमज निर्माण होतात. शनिवार व रविवारी गाड्यांची गर्दी असते.