पणजी : पुढारी वृत्तसेवा
सर्वांचे आवडते पर्यटन स्थळ असलेल्या गोव्यात डिसेंबर महिन्यात अनेक इव्हेंट, कार्यक्रम आणि सणांची रेलचेल असते. बारा महिन्यांपासून सर्वाधिक पर्यटकांची वर्ग असते.गोवा म्हटले की अनेकांच्या डोळ्यासमोर फक्त पार्टी आणि आकर्षक समुद्रकिनारे येतात.
पण खरे पाहता डिसेंबरमधला गोवा खूप वेगळा आणि आल्हाददायी अनुभवांनी भरलेला असतो. या डिसेंबर महिन्यात जर तुम्ही गोव्यात येण्याचं ठरवत असाल तर कोणकोणत्या ठिकाणी भेट देता येईल अशा ५ महत्त्वाच्या गोष्टींबाबत इथे जाणून घ्या.
1) सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल
कला, संगीत, नृत्य, नाटक किंवा चांगल्या खाण्याची आवड असेल, तर पणजी आणि नजीकच्या परिसरात असलेला सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल तुमच्यासाठी पर्वणीच आहे.
डिसेंबरमध्ये राजधानीत होणारा हा महोत्सव देशातील सर्वात मोठ्या कला उत्सवांपैकी एक मानला जातो. जगभरातून आलेले शेकडो कलाकार यात सहभागी होतात.
आठ दिवस चालणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये पणजीचे रूपच बदलून जाते. त्यामुळे केवळ बीचवर फिरण्यापेक्षा सेरेन्डिपिटी ला भेट देऊन वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी होणे हा अविस्मरणीय अनुभव जरूर घेतला पाहिजे.
2) गोव्यातील ख्रिसमस
ख्रिसमसदरम्यान गोवा काहीसा वेगळाच भासतो. रस्त्यांवर लखलखणारे दिवे, घराघरांत लावलेले आकाशकंदील आणि आकर्षक विद्युत् रोषणाई, चर्चमधून कानी पडणारी कॅरोल्स या सगळ्याचा माहोलच छान असतो. या काळात पणजीसह होणारी कॅरोलिंग, मिडनाईट मास आणि त्यानंतर सुरू होणाऱ्या ख्रिसमस बॉल्स , हे सगळे अनुभवल्यानंतर तुम्ही पुन्हा पुन्हा गोव्यात येणे पसंत कराल.
3) समुद्रकिनाऱ्यावरची निवांत संध्याकाळ
गोवा आणि समुद्रकिनारा हे तर प्रसिद्ध आणि सर्वांचे आवडते समीकरण आहे मुळात डिसेंबरमध्ये वातावरणातील बदलांमुळे समुद्रकिनारावरचे संध्याकाळ एरवी पेक्षा अतिशय शांत आणि अल्हाददायक वाटते. कडक उन्हाऐवजी थंड, मन प्रसन्न करणारा वारा असतो. बीचवरील शॅक्स, संध्याकाळी आकाशात फटाके आणि समोर सूर्यास्ताचे अप्रतिम दृश्य या सगळ्यामुळे तुमची सुट्टी कायमस्वरूपी लक्षात राहण्यासारखी होईल.
4) गोव्यातील पारंपरिक गोड पदार्थ
ख्रिसमसच्या महिन्यात गोमंतकीय गोड पदार्थांना बाजारात विशेष मागणी असते. ख्रिस्ती बांधवांच्या घरोघरी या दिवसांमध्ये केक, बेबींका, दोदोल, नेवऱ्या इत्यादी गोड पदार्थ बनवले जातात. खासकरून दक्षिण गोव्यातील लोटली गावात असलेली ‘जिला बेकरी’ ही गोव्याची सर्वात जुनी बेकरी आहे.या बेकरीत मिळणारे प्लम केक, एक्लेअर्स, कॅरमेल बटर केक, अॅपल स्ट्रुडल आणि इतर खास पदार्थ इतके लोकप्रिय आहेत की ते नक्की खाल्ले पाहिजेत.
5) यॉटवर नवीन वर्षाचे स्वागत
डिसेंबरमध्ये नववर्षाचे स्वागत करण्यासाठी देखील अनेक जण गोव्यात येत असतात. यावर्षी एरवीच्या गर्दीपासून दूर, समुद्रावर तरंगणाऱ्या यॉटवर नवीन वर्षाचे स्वागत करणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. शांत मधुर संगीत, कॅन्डल लाईट डिनर, मन प्रसन्न करणारे आकाश - तारे आणि या सगळ्याच्या साक्षीने आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत आतषबाजी करत नवीन वर्षाचे स्वागत करणे, याहून उत्कृष्ट अनुभूती अजून कोणती असेल? मग यंदा यॉट क्रूझवर हा अनुभव नक्की घ्या