पणजी : पुढारी वृत्तसेवा
५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) तयारी आता वेगाने सुरू करण्यात आली आहे. २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान राजधानी पणजीत होणाऱ्या या महोत्सवासाठी गोवा मनोरंजन सोसायटी, कला अकादमीसह इप्फीतील सादरीकरण होणाऱ्या ठिकाणी सजावटीचे काम वेगाने सुरू आहे.
येथील गोवा मनोरंजन संस्था परिसरात सध्या सजावटीचे काम वेगाने सुरू आहे. यंदाच्या थीमनुसार सजावट केली जात आहे. यासाठी जुन्या जीएमसी इमारत परिसरात झाडे आणि परिसरात विद्युत रोषणाईसाठी सजावट करण्यात येत आहे. रंगरंगोटीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रवेशद्वारावरील कमानी आणि अन्य सजावट कामासाठी कामगार मेहनत घेत आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही चित्रपट रसिकांचे लक्ष गोव्याकडे लागले असून, महोत्सवाच्या शानदार आयोजनासाठी प्रशासकीय आणि सांस्कृतिक पातळीवर जोरदार तयारी सुरू आहे. महोत्सवात जागतिक स्तरावरी सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्गज दिग्दर्शक आणि अभिनेते सहभागी होणार आहेत. देश-विदेशातून येणाऱ्या पाहुण्यांसाठी आणि प्रतिनिधींसाठी उच्च दर्जाच्या सुविधा, निवासव्यवस्था आणि कडेकोट सुरक्षा यंत्रणा उभारण्याबरोबरच आवश्यक तयारी आणि सजावटीचे काम सुरू झाले आहे.
डिजिटल यंत्रणा कार्यान्वित
दरम्यान, प्रतिनिधी नोंदणी सुरू असून नोंदणीपासून ते चित्रपट स्क्रिनिंगच्या वेळापत्रकापर्यंत सर्वकाही सुलभ करण्यासाठी आधुनिक डिजिटल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. चित्रपटप्रेमी आणि कलाकारांसाठी हा सोहळा एक पर्वणी ठरणार आहे.
विविध ठिकाणी प्रदर्शन
यंदा आयनॉक्स पणजी, पर्वरी, मॅकेनिज पॅलेस, रवींद्र भवन, मॅजिक मुव्हिज फौंडा, अशोक आणि सम्राट थिएटर पणजी येथे इप्फीतील चित्रपट प्रदर्शन होणार आहे. तर ओपन एअर स्क्रिनींग मिरामार, हणजून बीच, मडगाव रवींद्र भवनची मोकळी जागा, वागातोर बीच येथे होईल. उद्घाटन आणि समारोप सोहळा ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम येथे होणार असून मास्टर क्लास आणि इन कन्व्हर्सेशन कला अकादमीत होणार आहेत.