पेडणे : पुढारी वृत्तसेवा
इब्रामपूर परिसरात रानटी गव्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून, या गव्यांच्या हल्ल्यात अजित हरी गवस यांच्या दोन गायी जखमी झाल्याची घटना १६ रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास घडली. जखमी गाईवर सरकारी पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या सहकार्याने उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रानटी गव्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी अजित हरी गवस यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १६ रोजी दुपारी इब्रामपूर परिसरातून दहा ते बारा रानटी गव्यांचा कळप जात होता.
त्याचवेळी विरुद्ध दिशेने पाळीव जनावरे येत असताना गव्यांनी अचानक दोन गार्टीवर हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही गाई गंभीर जखमी झाल्या. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
इब्रामपूर परिसरात रानटी गव्यांचा वावर वाढला असून, हे गवे शेतांमध्ये घुसून शेती आणि बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. आता केवळ पिके आणि बागायतीच नव्हे, तर पाळीव जनावरांनाही या रानटी प्राण्यांपासून धोका निर्माण झाला आहे.
वस्तीच्या आसपासही त्यांचा वावर वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या समस्येकडे वन खात्याने लक्ष देऊनही अद्याप ठोस उपाययोजना केलेली नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. त्यामुळे गव्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
तत्काळ उपाययोजना करा
वन खात्याने या समस्येची तातडीने दखल घेऊन गव्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. तसेच शेती-बागायतीचे नुकसान आणि पाळीव जनावरांवरील हल्ले रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी अजित हरी गवस यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
नैसर्गिक आपत्ती किंवा रानटी जनावरांमुळे होणाऱ्या नुकसानीचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत सरकारकडून मिळणारी नुकसानभरपाईही पुरेशी नसते. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या शेतीचे आणि पशुधनाचे संरक्षण करण्याची जबाबदारी प्रशासनाने गांभीर्याने पार पाडावी.अजित हरी गवस,