पणजी : राज्यातील विविध सरकारी उच्च नाध्यमिक विद्यालयांमध्ये गेली १० ते १५ वर्षे कंत्राटी व तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षकांच्या नोकरीचा आणि करिअरचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. २२ ऑक्टोबरपर्यंत सकारात्मक निर्णय न झाल्यास २३ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व तासिका व कंत्राटी शेक्षक आझाद मैदानावर बेमुदत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
शिक्षण खात्याने घेतलेल्या नव्या धोरणांमुळे आणि अंतर्गत पदोन्नतीमुळे या शिक्षकांवर अन्याय होत असल्याचा आरोप शिक्षकांनी सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
अॅड. अजय प्रभुगावकर यांनी सांगितले की, २००९ नंतर उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये पदभरती झालेली नाही. त्यामुळे गेल्या १५ वर्षांपासून या तासिका तत्त्वावरील शिक्षकांनी संपूर्ण कामाचा भार सांभाळला आहे. मात्र, आता सरकार नवी भरती व पदोन्नती धोरण आणून या जुन्या शिक्षकांना सेवेतून बाहेर काढत आहे, जे अत्यंत अन्यायकारक आहे.
आधी या शिक्षकांना महिन्याला १०० ते १०६ तासिका मिळून ४० ते ४५ हजार रुपये वेतन मिळत होते. मात्र, आता नियमित शिक्षक आल्याने तासिकेवरील शिक्षकांना केवळ १५ ते १६ हजार रुपयेच मानधन मिळत आहे. ज्यामुळे कुटुंबाचा गाडा चालवणे कठीण झाले आहे, असे सांगून अॅड. प्रभुगावकर म्हणाले, 'समग्र शिक्षा अभियान' किंवा इतर योजनांतर्गत या शिक्षकांचा समावेश करताना त्यांच्या सेवाज्येष्ठतेचा विचार करून त्यांना योग्य वेतनश्रेणी देण्यात यावी. त्याबरोबरच गेली १५ वर्षे सेवा बजावलेल्या शिक्षकांसाठी 'सुपरन्यूमस्री' पदे निर्माण करून त्यांच्या नोकरीचे संरक्षण करावे.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आगामी परीक्षांचा विचार करून शिक्षकांनी सध्या आंदोलनाचा मार्ग सौम्य ठेवला आहे. परंतु, सरकारला या प्रश्नावर त्वरित तोडगा काढण्यासाठी दि. २२ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. २२ ऑक्टोबरपर्यंत सकारात्मक निर्णय न झाल्यास २३ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व तासिका व कंत्राटी शिक्षक आझाद मैदानावर बेमुदत आंदोलनसाठी बसतील, असा थेट इशारा अॅड. प्रभूगावकर यांनी या शिक्षकांच्यावतीने दिला आहे.
यावेळी तासिका तत्त्वावर काम करणारे शिक्षकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामधील काहींची सेवाही २५ वर्षांची झाली आहे. जास्त काळ शैक्षणिक क्षेत्रात घालविल्यानंतर अशी स्थिती उद्भवल्यामुळे त्यांनी भविष्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.