पणजी : अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे पट्टे, तसेच कोकण किनारपट्टीच्या भूखंडीय भागांमध्ये निर्माण झालेला ऑफ शोअर टर्फ यामुळे गोव्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. राज्यातील सर्व सातही धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने अनेक रस्ते, नद्यांवरील पूल पाण्याखाली गेले आहेत. हवामान खात्याने अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे. प्रशासनाने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तर मच्छीमाऱ्यांना मासेमारीसाठी समुद्रात उतरू नये, असे हवामान खात्याबरोबर मच्छीमार खाते आणि कॅप्टन ऑफ पोर्टने सूचना दिल्या आहेत.
मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड, रस्ता खचणे, घरांच्या भिंती कोसळणे, विजेचे खांब पडणे यासारख्या घटना घडत आहेत. बुधवारी रात्रीपासून पावसाने पुन्हा जोर धरल्याने सकाळपर्यंत अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे उत्तर गोव्यातील वाळवंटी नदीला पूर आला असून केरी-घोटेली पूल पाण्याखाली गेला आहे. दक्षिण गोव्यातील दूधसागर नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने निरंकाल येथील, तर म्हादईची पातळी वाढल्याने गांजे-उसगाव रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. नानोडा-डिचोली येथे विद्यार्थ्यांना आणण्यासाठी जाणारी कदंब बस पुराच्या पाण्यात अडकली आहे. पावसामुळे साळमधील भूमिका मंदिर परिसरात पाणी आल्याने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. वाळपई-फोंडा रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
कळणे नदीला पूर आल्याने चांदेलमधील रस्ता पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे चांदेलचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे. कासारवर्णेतही पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. दक्षिणेतही पावसाने जनजीवन विस्कळीत केले असून, शिरवई-जांबावलीतील (कुडचडे) रस्ता पाण्याखाली गेल्याने परिसरात पुराची स्थिती निर्माण झाली आहे.