

मडगाव : गेल्या ४८ तासापासून सुरू असलेल्या संततधार पावसाने केपे तालुक्याला झोडपून काढले आहे. शिरवईचा मुख्य रस्ता पाण्याखाली गेला असून कुशावती नदीला आलेल्या पुरामुळे पारोडा पुन्हा बुडाला आहे. दरम्यान, पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने केपेला येण्यासाठी पारोड्याच्या रस्त्याचा अवलंब करणे एका साठ वर्षीय वृद्धाला महागात पडले. परोडा येथे पुराच्या पाण्यात त्यांची कार बंद पडल्याने ते आत अडकले. कुडचडे अग्निशामक दलाने तात्काळ धाव घेतली आणि त्यांना गाडीतून बाहेर काढत जीव वाचवला. मात्र त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात अग्निशामक दलाची गाडी पुराच्या पाण्यात अडकून पडली आहे.
पाण्यात अडकून पडलेल्या नागरीकाचे नाव युगानंद आष्टेकर (वय ६०) असे असून ते जुने गोवे येथील रहिवासी आहेत. परोडा बुडाल्याची त्यांना कल्पना नव्हती. त्यांनी तशीच आपली कार परोड्याच्या रस्त्यावर उतरवली. पर्वताचा रस्ता ओलांडल्यानंतर त्यांची गाडी पाण्यात बुडाली आणि ते गाडीत अडकून पडले. या घटनेची माहिती कुडचडे अग्निशामक दलाला देण्यात आली. अग्निशामक दलाच्या जवानांनी ताबडतोप परोड्यात धाव घेतली. पण काराळी येथे पुराचे पाणी पोचल्यामुळे त्यांना वाटेतच गाडी ठेवून पायी चालत पुढे जावे लागले. पुराच्या पाण्यात अडकलेल्या अष्टेकर यांना बाहेर काढून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. पण त्यांची गाडी बाहेर काढणे त्यांना शक्य झाले नाही. अग्निशामक दलाची गाडी सध्या कराळी येथे अडकून पडली आहे.