पेडणे : पुढारी वृत्तसेवा
धारगळ येथील महा-खाजन परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात साळ-मधलावाडा येथील दाम्पत्य ठार झाले. ट्रकचा टायर फुटल्याने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघातात रामचंद्र चंद्रकांत राऊत (वय ६३) आणि त्यांच्या पत्नी रेश्मा रामचंद्र राऊत यांचा मृत्यू झाला.
हे दाम्पत्य कामानिमित्त पेडणे येथे गेले होते. काम आटोपून परतत असताना हा अपघात घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीए-०३-व्ही-८७७३ क्रमांकाचा काँक्रीट पावडरने भरलेला ट्रक आणि जीए-०४-एम-८१९१ क्रमांकाची दुचाकी म्हापशाच्या दिशेने जात होते.
धारगळ महा-खाजन येथे ट्रकचे मागील चाक फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर दुचाकी ट्रकखाली ओढली गेल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पेडणे पोलिसांनी पंचनामा केला.
अपघातामुळे काही काळ महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत पुढील तपास सुरू केला आहे. रामचंद्र राऊत हे कदंब परिवहन महामंडळातून वाहक पदावरून निवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात दोन पुत्र आहेत
३६ तासांत सात जणांचा मृत्यू
राज्यात गेल्या ३६ तासांत विविध ठिकाणी झालेल्या रस्ता अपघातांत एकूण सात जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनांमुळे रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन आणि बेदरकार वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
चालकाला अटक...
अपघात प्रकरणी ट्रक चालक लक्षदीप चलवादी (२३वर्षे, मूळ रा. कर्नाटक व सध्या पेडे, म्हापसा) याला पेडणे पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सीमेपुरुषकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.