पणजी : महाराष्ट्र आणि कर्नाटकातून मुलांना गोव्यात आणून त्यांना भीक मागणे, समुद्र किनाऱ्यांवर मुलांकडून मसाज करून घेणे, तसेच इतर बेकायदा कामांमध्ये ढकलले जात असल्याच्या प्रकाराची मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आज बुधवारी गंभीर दखल घेतली. गोव्यात ही मोठ्या प्रमाणावरील मानवी शोकांतिका आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
गोव्यात भीक मागणारी सापडलेली मुले धाराशिव (उस्मानाबाद) येथील असल्याने त्यांच्या पुनर्वसन, पोषण व शालेय शिक्षणसंदर्भात कोणती पावले उचलण्यात आली आहे, याची सविस्तर माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्याचे निर्देश गोवा खंडपीठाने धाराशिवच्या बालकल्याण समितीला देऊन पुढील सुनावणी १३ ऑक्टोबरला ठेवली आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटकातून गोव्यात आणल्या जाणाऱ्या मुलांचा वापर भीक मागणे, समुद्रकिनाऱ्यांवर मसाज करणे आणि अन्य बेकायदा कामांसाठी केला जात असल्याचे न्यायालयाने नमूद केले. त्यामुळे केवळ हा प्रश्न मुलांच्या भीक मागण्यापुरता मर्यादित न राहता मुलांच्या व्यापक शोषणाचीही तपासणी केली जाऊ शकते, असे संकेत खंडपीठाने दिले.