पणजी : पुढारी वृत्तसेवा
२०१३ मधील कथित लैंगिक अत्याचार प्रकरणात माजी संपादक - संचालक तरुण तेजपाल यांच्या निर्दोषत्वाला आव्हान दिलेल्या गोवा सरकारच्या अर्जावरील अंतिम सुनावणी (३० जुलै) पूर्ण होऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने निकाल राखून ठेवला.
तेजपाल याने पाठवलेल्या माफीच्या ई-मेलवरून सरकार आणि बचाव पक्षात जोरदार युक्तिवाद झाला. अंतिम युक्तिवादादरम्यान सरकारी पक्षाने तेजपाल यांनी कथित घटनेनंतर तक्रारदाराला पाठवलेल्या माफीच्या ई-मेलवर भर दिला.
राज्य सरकारतर्फे बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी हा ई-मेल म्हणजे दोषाची कबुली असल्याचा दावा केला. हा ई-मेल केवळ खेद व्यक्त करणारा नसून, तक्रारदाराने केलेल्या आरोपांची कबुली देणारा असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले.
दुसरीकडे, तेजपाल यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी ई-मेलचे लेखकत्व आणि त्याचा अर्थ या दोन्ही बाबींवर आक्षेप घेतला. नोंदीवरील पुराव्यावरून हा माफीचा ई-मेल स्वतः तेजपाल यांनी तयार केलेला नसल्याचे त्यांनी न्यायालयात मांडले.
याशिवाय, ई-मेल ग्राह्य धरला तरी त्यात कोणत्याही शारीरिक किंवा लैंगिक अत्याचाराची कबुली नसल्याचे पोंडा यांनी स्पष्ट केले. ई-मेलमध्ये केवळ "दारूच्या नशेत झालेल्या हलक्या-फुलक्या संभाषणाबद्दल" दिलगिरी व्यक्त करण्यात आली असून, आरोपपत्रातील गुन्ह्यांची कबुली त्यात कुठेही नसल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. बचाव पक्षाने सीसीटीव्ही पुराव्याचाही मुद्दा उपस्थित केला.
हरवलेले सीसीटीव्ही फुटेज लिफ्टच्या हालचालींबाबत बचाव पक्षाचा दावा स्वतंत्रपणे सिद्ध करू शकले असते. ते सादर न करणे ही तपासातील गंभीर त्रुटी असून, तेजपाल यांची निर्दोष मुक्तता करताना खटला चालविणाऱ्या न्यायालयानेही या बाबींची दखल घेतल्याचे बचाव पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
तक्रारदाराच्या कथनाशी सीसीटीव्हीतील वस्तुनिष्ठ पुरावे पूर्णपणे विसंगत असल्याचा दावा करत, तपास अधिकाऱ्यांनी हॉटेलच्या तळमजला आणि दुसऱ्या मजल्यावरील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले. मात्र अत्यंत महत्त्वाचे असलेले पहिल्या मजल्यावरील फुटेज नोंदीवर आणले नाही, असे पोंडा यांनी सांगितले. तपासादरम्यान पोलिस साक्षीदारांनी हे फुटेज पाहिल्याची कबुली दिली होती, असेही त्यांनी नमूद केले.