पणजी : पुढारी वृत्तसेवा
दुधसागर धबधब्यावर जाणाऱ्या जीप ट्रिप्स सरकारच्या नियमांना डावलून एका खासगी तेथीलच टूर ऑपरेटर्स असोसिएशनमार्फत चालवल्या जात असून त्यातून बेकायदेशीररीत्या आर्थिक वसुली केली जात असल्याच्या गंभीर आरोपांची दखल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने घेतली आहे.
खंडपीठाने दुधसागर टूर ऑपरेटर्स असोसिएशनला (डीटीओटी) नोटीस बजा बजावून त्यावरील सुनावणी ४ मार्च २०२६ रोजी ठेवली आहे. अशोक खांडेपारकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की दुधसागर टूर ऑपरेटर्स असोसिएशनकडे (डीटीओटी) जीप ट्रिप्सचा कोणताही कायदेशीर अधिकार नसताना हे असोसिएशन जीप ट्रिप्सचा रोस्टर सांभाळत आहे
तसेच जीप मालकांकडून प्रत्येक ट्रिपसाठी २० रुपये याप्रमाणे पैसे गोळा करत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, असोसिएशनकडे नोंदणीकृत ४३१ ऑफ-रोड वाहने असून प्रतिदिन केवळ २४० ट्रिप्सना परवानगी आहे. मात्र प्रत्येक ट्रिपसाठी २० रुपये आकारले जात असून, त्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणात रक्कम जमा केली जात आहे. सरकारी नियमांनुसार संपूर्ण व्यवस्था ही शासनामार्फतच राबवली जाणे आवश्यक आहे.
कोणत्याही खासगी संघटनेला याचा अधिकार नाही, असे खांडेपारकर यांच्या वकिलांनी निदर्शनास आणून दिले. वैध परवाना असूनही आपल्याला जाणीवपूर्वक ट्रिप्स नाकारल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
रोस्टरमध्ये माझे नाव लाल रंगात दाखवून माझ्या ट्रिप्स इतरांना दिल्या जात आहेत, असा दावा त्यांनी केला. सुनावणीदरम्यान राज्य सरकारनेही ही व्यवस्था चुकीची असल्याची कबुली दिली. दुधसागर जीप ट्रिप्सचे संचालन किंवा त्यासाठी पैसे गोळा करण्याचा अधिकार असोसिएशनकडे नसल्याचे सरकारने न्यायालयात मान्य केले व यासंदर्भात सूचना घेऊन माहिती देण्याचे आश्वासन दिले.
याचिकेत गोवा राज्य सरकारचे मुख्य सचिव, प्रधान मुख्य वनसंरक्षक, उपवनसंरक्षक, मुख्य वन्यजीव संरक्षक, रेंज फॉरेस्ट अधिकारी तसेच दुधसागर टूर ऑपरेटर्स असोसिएशनला प्रतिवादी करण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे दुधसागर जीप ट्रिप्सच्या ऑनलाइन बुकिंग व्यवस्थेवरील जुने वाद पुन्हा चर्चेत आले आहेत. गेल्या वर्षी कुळेमधील या दुधसागर टूर ऑपरेटर्स असोसिएशनने गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या ऑनलाइन बुकिंग प्रणालीला विरोध करत संकेतस्थळाचे नियंत्रण सरकारकडून संघटनेकडे देण्याची मागणी केली होती.